Home » अर्थ, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय » दररोज दीड कोटी ५००च्या नोटांची छपाई

दररोज दीड कोटी ५००च्या नोटांची छपाई

•कर्मचार्‍यांचे युद्धस्तरावर काम सुरू
•वितरण करण्यासाठी विमानसेवा,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १ डिसेंबर –
new-currency-notes-of-rs-500५०० व एक हजारच्या नोटबंदी निर्णयानंतर, देशातील नव्या नोटांचा तुटवडा लवकरात लवकर भरून निघावा म्हणून, गेल्या पंधरा दिवसांपासून दररोज पाचशे रुपयांच्या दीड कोटी नोटा छापणे सुरू आहे. छापलेल्या या नव्या नोटांचा, देशातील ४ हजार ४०० गोदामांमध्ये वितरण करण्यासाठी विमानांचा उपयोग करण्यात येत आहे.
पाचशेच्या नोटांची छपाई सिक्युरिटी प्रिंटिंग ऍण्ड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एसपीएमसीआयएल)च्या देवास (मध्यप्रदेश) व नाशिक येथील प्रिंटिंग प्रेसमध्ये होत आहे. सध्या इथले सुमारे ३ हजार कर्मचारी अहोरात्र काम करून, विक्रमी उत्पादन करीत आहेत.
या कर्मचार्‍यांना सांगण्यात आले आहे की, तुम्ही देखील युद्धसदृश स्थितीत काम करीत आहात. तुम्ही छापत असलेल्या पाचशेच्या नोटांची सारा देश आतुरतेने वाट बघत आहे, असे सांगून त्यांना प्रोत्साहित करण्यात येत आहे. त्याचा परिणाम म्हणून, देवास येथील प्रिंटिंग प्रेसमध्ये गेल्या १५ दिवसांपासून दरदिवशी ६० लाख नोटांऐवजी १ कोटी नोटा छापल्या जात आहेत. तसेच नाशिक येथील उत्पादन ३० लाख नोटांवरून दरदिवशी ५० लाख नोटांवर गेले आहे.
कामाचा अतिरिक्त ताण, कर्मचारी देशासाठी सहन करीत आहेत. परंतु, प्रिंटिंग मशिन्स मात्र बर्‍याचदा या ताणामुळे बंद पडतात. या मशिन्सची दुरुस्ती करण्यात टाळाटाळ केल्यामुळे असले प्रकार होत असले तरी, परिस्थिती बघता त्यावरही मात करून काम खंडित होणार नाही, याची काळजी घेण्यात येत असल्याचे, या प्रिंटिंग प्रेसमधील अधिकार्‍यांनी सांगितले.
इतक्या मोठ्या प्रमाणात छपाई सुरू असताना देखील चलनी नोटांसाठी वापरण्यात येणार्‍या कागदाचा मात्र पुरेसा साठा आहे. त्यामुळे हा विशिष्ट कागद आयात करण्याची अजून पाळी आली नाही व कदाचित पुढेही येणार नाही, असे एका अधिकार्‍याने सांगितले. फक्त विशिष्ट प्रकारची एक शाई, जिला ऑप्टिकली व्हेरिएबल इंक असे म्हणतात, ती मात्र स्वित्झर्लंडहून आयात करावी लागली. चलनी नोटेची नकल करता येऊ नये म्हणून जी सुरक्षा वैशिष्ट्ये अवलंबिली आहेत, त्यात या शाईचाही अंतर्भाव आहे, हे विशेष. फक्त काही रसायने आणि नोटांचे पुठ्‌ठल भरण्यासाठी बारदाना यांची मात्र दररोज प्रचंड प्रमाणात खरेदी करण्यात येत आहे.
युद्धस्तरावर सुरू असलेल्या या कामामुळे प्रिंटिंग प्रेसमधील कर्मचार्‍यांना आर्थिक लाभ देखील झाला आहे. कर्मचार्‍यांना टारगेट अलाऊंस देण्याची घोषणा झाली आहे. त्यांना महिन्याला सुमारे दहा हजार रुपये अधिकचे मिळतील. एवढेच नव्हे, तर कर्मचार्‍यांनी उत्साहात हे काम करावे म्हणून, कर्मचार्‍यांच्या बर्‍याच दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या देखील लवकरच मान्य करण्यात येतील, अशी घोषणा व्यवस्थापनाने केली आहे. त्या मागण्या मान्य झाल्या तर व्यवस्थापक आणि वरिष्ठ सुपरवायझर्स यांच्या पगारात वार्षिक २० ते ३० हजारांची वाढ होण्याची शक्यता आहे.

शेअर करा

Posted by on Dec 2 2016. Filed under अर्थ, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google