Home » छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र » नगरपालिकांत भाजपाची जोरदार मुसंडी!

नगरपालिकांत भाजपाची जोरदार मुसंडी!

३० पालिकांमध्ये सत्ता, ५० पेक्षा जास्त नगराध्यक्ष

•पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, पंकजा मुंडे, जयंत पाटील, विष्णू सवरा यांना पराभवाचा धक्का
•कॉंग्रेस, राष्ट्रवादीला धोबीपछाड
•शिवसेना दुसर्‍या क्रमांकावर,

तभा वृत्तसेवा
मुंबई, २८ नोव्हेंबर –
bjp-yatraमहाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात झालेल्या १४७ नगरपालिका आणि १८ नगरपंचायतींच्या निवडणुकींचे निकाल सोमवारी जाहीर झाले असून त्यात भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. भाजपाने ३० पालिकांमध्ये सत्ता काबीज केली असून भाजपाचे ५० पेक्षा जास्त नगराध्यक्ष निवडून आले आहेत. भाजपाने कॉंग्रेस-राष्ट्रवादीला धोबी पछाड दिली आहे. शिवसेना दुसऱ्या क्रमांकवर राहिली आहे.
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातनगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत मोठमोठ्या नेत्यांना पराभव पाहावा लागला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड मतदारसंघात भाजपाच्या रोहिणी शिंदे विजयी झाल्या आहेत. तर बहुमत मात्र कॉंग्रेसला मिळाले. गड आला पण सिंह गेला, अशी स्थिती येथे चव्हाणांची झाली आहे. परळीमध्ये महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे या भावाबहिणीच्या तुंबळ युद्धात धनंजय मुंडे यांनी परळीत बहुमतासह अध्यक्षपदही पटकावले आहे. तासगाव मतदारसंघात भाजपाचे विजय सावंत हे विजयी झाले असून बहुमतही भाजपाने मिळविले आहे.
आदिवासी विकास मंत्री विष्णु सवरा यांचा पालघरमधील तीन नगरपंचायतीत पराभव झाला आहे. यापैकी तलासरीची जागा माकपने, मोखाडा शिवसेनेने तर विक्रमपूरची जागा विकास आघाडीने पटकावली आहे. भाजपाचे खासदार संजयकाका पाटील यांनी कवठेमहांकाळची जागा गमावली आहे. पण, तासगावची जागा कायम राखली आहे. येथे भाजपाच्या नगराध्यक्षासह सत्ताही मिळाली आहे. जयंत पाटील यांच्या इस्लामपूरमध्ये त्यांना पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. येथे स्वाभिमानी विकास आघाडीने अध्यक्षपदासह सत्ताही हिसकून घेतली आहे. भोकरदनमध्ये भाजपाचे नगराध्यक्ष रावसाहेब दानवे यांना पराभव पाहावा लागला आहे. येथे कॉंग्रेसची सत्ता आली असून भाजपाला फक्त चार जागा मिळाल्या आहेत. मालवणमध्ये नारायण राणेंना पराभवाचा धक्का बसला आहे. ही नगरपालिका शिवसेनेने हिसकून घेतली आहे. नितेश राणे यांनी मात्र देवगडची जागा कायम राखण्यात यश मिळविले आहे. अहमदनगरमधील राहता मतदारसंघात राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उमेदवाराचा पराभव झाला. तर नगरमधील परतूरमध्ये बबनराव लोणीकर यांना पराभव पाहावा लागला आहे. वाईमध्ये सत्ता राष्ट्रवादीला पण नगराध्यक्ष भाजपाचा अशी निवड मतदारांनी केली आहे. खेडमध्ये मनसेचा उमेदवार अध्यक्षपदी निवडून आला आहे.

भाजपाचे निवडून आलेले नगराध्यक्ष:

पश्‍चिम महाराष्ट्र
सातारा जिल्हा – वाई, कराड
अहमदनगर जिल्हा – राहता, पाथर्डी
सोलापूर जिल्हा – अक्कलकोट, दुधनी
कोल्हापूर जिल्हा – इचलकरंजी, मलकापूर
सांगली जिल्हा – तासगाव, पलुस

मराठवाडा
बीड जिल्हा – गेवराई
जालना जिल्हा – अंबड
हिंगोली जिल्हा – हिंगोली
परभणी जिल्हा – मानवत

विदर्भ
अकोला जिल्हा- तेल्हारा, आकोट, मूर्तिजापूर
चंद्रपूर जिल्हा – मूल, वरोडा, बल्लारपूर
वर्धा जिल्हा – आर्वी, देवळी, वर्धा, हिंगणघाट, पुलगाव, सिंदी रेल्वे
अमरावती जिल्हा – धामणगाव, अंजनगाव सुर्जी, चांदूर बाजार, दर्यापूर, मोर्शी, शेंदूरजनाघाट, वरुड
बुलडाणा जिल्हा – जळगाव जामोद, देऊळगाव राजा, चिखली, शेगाव, खामगाव, बुलडाणा, नांदुरा
यवतमाळ जिल्हा – उमरखेड, वणी

उत्तर महाराष्ट्र
धुळे जिल्हा – दोंडाईचा
नाशिक जिल्हा – देवळाली प्रवरा, येवला
जळगाव जिल्हा – सावदा, एरंडोल, फैजपूर, चाळीसगाव, भुसावळ, पाचोरा
नंदुरबार जिल्हा – शहादा

कोकण
रायगड जिल्हा – उरण
सिंधुदुर्ग जिल्हा – वेंगुर्ला
रत्नागिरी जिल्हा – चिपळूण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानले

महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्याच्या नगरपालिका निवडणुकीत जनतेने भाजपाला कौल देणार्‍या मतदारांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानले आहेत. भाजपाच्या विकास आणि गरिबांविषयी असलेल्या आस्थेमुळेच हा विजय मिळाला आहे, असे मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

शिवछत्रपतींचे आशीर्वाद, जनतेच्या विश्‍वासामुळे जिंकलो!
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद आणि केंद्र व राज्य सरकारच्या विकास कामांवर जनतेने दाखविलेला सार्थ विश्‍वास यामुळेच नगरपालिका निवडणुकीत दणदणीत विजय आम्ही संपादन करू शकलो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
राज्यासमोर अनेक आव्हाने होती. पण, त्याची सोडवणूक करण्यासाठी राज्य सरकार ज्या योजना आखते आहे, जे उपाय करते आहे, त्यावर राज्यातील जनतेने व्यक्त केलेले हे समाधान आहे. त्यामुळे जनतेचा विश्‍वास अधिक दृढ झाला आहे. पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वातील सरकार सुद्धा गरिब आणि मध्यमवर्गीयांसाठी अनेक योजना राबवित आहे. त्यावर सुद्धा मतदारांनी अतिशय भरभरून यश आम्हाला दिले, याचा निश्‍चितच आनंद आहे. या यशात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे, आपल्या मंत्रिमंडळातील सर्व सहकारी, पदाधिकारी आणि सर्वांत महत्त्वाचे कार्यकर्त्यांचे श्रेय अधिक आहे. या सर्वांचे मी मन:पूर्वक अभिनंदन करतो, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

विदर्भात भाजपाची मुसंडी
विदर्भात निवडणूक झालेल्या ४१ मतदारसंघांपैकी २६ ठिकाणी भाजपाचे नगराध्यक्ष जिंकून आले असून बहुमतही मिळाले आहे. वर्ध्यात सहापैकी सहा नगरपालिकांमध्ये भाजपाचे उमेदवार निवडून आले असून सत्ताही मतदारांनी भाजपाच्याच हाती दिली आहे. चंद्रपूरमध्ये चारपैकी तीन जागी भाजपाचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. अमरावतीत नऊपैकी पाच, बुलढाण्यात सहापैकी तीन, वाशीममध्ये तीनपैकी दोन आणि यवतमाळमध्ये आठपैकी तीन जागी भाजपाचे नगराध्यक्ष आणि उमेदवार विजयी झाले आहेत.

पृथ्वीराज चव्हाण
पैसे घेऊन पदे दिली जातात, या राणेंच्या विधानाशी मी सहमत आहे. या निवडणुकीत कॉंग्रेसचा आक्रमकपणा जाणवलाच नाही. आमच्यात संवाद आणि समन्वयाचाही अभाव असल्यानेच हे निकाल आले आहेत, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.
पंकजा मुंडे
मतदारांनी जो कौल दिला आहे, तो मला मान्य आहे. आमचा पराभव का झाला, याची कारणं आम्ही शोधू आणि आत्मचिंतन करू. धनंजय मुंडे यांचे अभिनंदन! अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे. तर, संपूर्ण मंत्रिमंडळ परळीत प्रचारासाठी आणूनही त्यांना विजय संपादन करता आला नाही, अशी कोपरखळी धनंजय मुंडे यांनी मारली.
बाळासाहेब थोरात
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची भूमिका नेहमी भारतीय जनता पक्षाला सहाय्यभूत अशीच राहिली आहे, अशा शब्दांत बाळासाहेब थोरात यांनी विखेंना घरचा अहेर दिला आहे.

शेअर करा

Posted by on Nov 28 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google