Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » निवडणूक प्रचार सल्लागार प्रशांत किशोरचे वलय अस्ताला

निवडणूक प्रचार सल्लागार प्रशांत किशोरचे वलय अस्ताला

=उत्तरप्रदेश सोडून आता पंजाबकडे लक्ष=
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, २८ नोव्हेंबर –
prashant-kishorनिवडणूक प्रचार तज्ज्ञ म्हणून एवढ्यातच प्रसिद्धीस आलेल्या प्रशांत किशोर यांचा करिष्मा उतरणीवर लागल्याची चर्चा सध्या राजधानी दिल्लीत सुरू आहे. उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाने प्रशांत किशोर यांची सेवा भाड्याने घेतल्यानंतर, काही महिन्यांतच किशोर यांना समजून चुकले की, उत्तरप्रदेशात आपली डाळ काही शिजणार नाही. त्यामुळे आता प्रशांतने पंजाबवर लक्ष केंद्रित केले आहे. पंजाबमध्ये कॉंग्रेसला आपली कामगिरी सुधारण्याची थोडीफार आशा असल्यामुळेच किशोर यांनी उत्तरप्रदेशला वार्‍यावर सोडल्याची माहिती आहे.
पंजाब विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाची सर्व सूत्रे पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याकडे आहेत. प्रशांत किशोरची पक्षांतर्गत बाबींमधील ढवळाढवळ बघता, अमरिंदर यांनी किशोरला हातभर दूरच ठेवले होते. अमरिंदर यांना त्यांच्या अधिकारक्षेत्रात कुणाचाही हस्तक्षेप मान्य नव्हता. कॉंग्रेस हायकमांडलाही हे मंजूर होते.
कॉंग्रेस पक्षाने प्रशांतला उत्तरप्रदेशच्या निवडणुकीसाठी करारबद्ध केल्यानंतर, त्याने याच राज्यावर आपले लक्ष केंद्रित केले होते. पंजाबकडे तो ढुंकूनही बघत नव्हता. हळुहळू प्रशांतला लक्षात आले की, आपण आपले कितीही पांडित्य खर्ची घातले तरी, उत्तर प्रदेशात कॉंग्रेसला काहीही भवितव्य नाही. याने आपली छबी डागाळली जाईल. म्हणून चाणाक्ष प्रशांतने अमरिंदरसिंगांशी संबंध वाढविले आणि पंजाब विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी सहकार्य करण्याची परवानगी मिळविली.
अमरिंदरसिंगांनी हुशारी दाखवीत, आपल्या अटींवर प्रशांतला निवडणूक प्रचाराची रणनीती आखण्यास संमती दिली आहे. उमेदवार निवडीमध्ये प्रशांतचे मत चालणार नाही. त्याने फक्त प्रचारापुरते योगदान द्यायचे, ही अट प्रशांतने मान्य केली आहे. आता अमरिंदर सिंगह हे प्रशांतच्या सल्ल्याने जनसंपर्काचे दौरे आखत आहेत. प्रशांतने त्यांना सांगितले की, तुमची राजघराण्याची छबी सामान्य जनतेला मान्य नाही. त्यामुळे सामान्य जनता कॉंग्रेसपासून दुरावत आहे. प्रशांतचा हा सल्ला अमरिंदरसिंगांनी ताबडतोब अमलात आणला. अमरिंदरसिंगांनी आता आपला राजघराण्याचा ताठा उतरवून ठेवला आहे. ते आता ढाब्यावर जात आहेत. सामान्य जनतेशी संवाद साधत आहेत.
प्रशांतने कॉंग्रेस पक्षातील आपले महत्त्व कायम राखण्यात यश मिळवले असले तरी, राजकीय पंडितांच्या दृष्टीने प्रशांतचे वलय अस्ताला जात असल्याचे हे संकेत आहेत.
२०१४च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर प्रशांत किशोरचे नाव समोर आले. नरेंद्र मोदींना निवडणूक प्रचाराबाबतचे सल्ले प्रशांत देत असे. या गोष्टीचा प्रशांतने आपली प्रतिमा निर्माण करण्यास भरपूर प्रयत्न केला. त्याचे फळ म्हणून बिहार विधानसभा निवडणुकीत नीतीशकुमारांनी त्याला आपला प्रचार-सल्लागार नेमला. बिहारमध्ये नीतीशकुमारांना विजय मिळाल्यामुळे प्रशांतचे भाव आकाशाला टेकले. प्रशांत किशोर निवडणूक जिंकून देतो, या भ्रमात राहुल गांधींनी उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी, वाट्टेल ती किंमत मोजून, प्रशांतची सेवा भाड्याने घेतली होती.
खरे तर, कुठल्याही निवडणुका अशा प्रचार-सल्लागाराच्या मदतीने जिंकल्या जात नाहीत. २०१४ची लोकसभा निवडणूक कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळेच भाजपाला जिंकता आली. बिहारमध्ये नीतीश व लालू यांची व्होटबँक अभेद्य राहिली आणि त्यामुळेच तिथे भाजपाचा पराभव झाला. सर्व सामाजिक समीकरणे मनासारखी जुळून आली तरच प्रचार-सल्लागाराचा फायदा होतो, हे सत्य आता प्रशांत किशोरला समजले असावे. परंतु, एक मात्र खरे, की प्रशांत किशोरचे वलय आणि किंमत आता घसरणीला लागली आहे.

शेअर करा

Posted by on Nov 28 2016. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google