Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » नोटबंदीवर शिवसेनेचा घूमजाव

नोटबंदीवर शिवसेनेचा घूमजाव

=निर्णयाला पाठिंबा, अंमलबजावणीवर चिंता=
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २३ नोव्हेंबर –
anandrao-adsul‘वर गेल्यानंतर मी बाळासाहेबांना ताठ मानेने सांगू शकेन की, मी चांगले काम करून आलो, तुमची हिंमत होईल काय?’ अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुनावल्यानंतर शिवसेना एकदम मवाळ झाली. नोटबंदीच्या निर्णयाला आमचा पाठिंबा आहे. पण, त्याच्या अंमलबजावणीबाबत आम्ही चिंतीत आहोत, अशी भूमिका शिवसेनेने आज विशद केली.
मंगळवारी पक्षाच्या शिष्टमंडळाने मोदी यांची भेट घेतली असता, त्यांनी आम्हाला चांगलेच खडसावले, हे प्रसारमाध्यमांचे वृत्त खोडसाळ असल्याचा दावाही शिवसेनेने केला. नोटबंदीच्या निर्णयानंतर सर्वसामान्यांना होत असलेल्या त्रासावर आम्ही या बैठकीत आपली भूमिका विशद केली होती. आज केंद्र सरकारने नाबार्डच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकरिता २१ हजार कोटींचा निधी वितरित करण्याचा निर्णय घेतला. ग्रामीण अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला असल्याने जिल्हा सहकारी बँकांना ग्रामीण व्यवहार करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी आम्ही केली होती. त्यानंतर आज लगेच हा निर्णय झाला, याकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लक्ष वेधले.
नोटाबंदीच्या विरोधात आम्ही ममता बॅनर्जी यांच्या निषेध मार्चमध्ये सहभागी झालो आणि राष्ट्रपतींचीही भेट घेतली असली, तरी हा निर्णय मागे घेण्याची मागणी आम्ही कधीच केली नाही. मंगळवारच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेब ठाकरेंबद्दल आदर व्यक्त करीत, या निर्णयात शिवसेनेची साथ हवी असल्याचे स्पष्ट केले होते, असे स्पष्टीकरण लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते आणि खासदार आनंदराव अडसूळ यांनी केले. मोदी यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला खडसावले, या बातम्या चुकीच्या असल्याचा त्यांनी दावा केला.
रालोआत संयोजक हवा
राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील विविध घटक पक्षांमध्ये योग्य समन्वय साधण्यासाठी संयोजकाची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी सेनेकडून करण्यात आली. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात अशा प्रकारचे पद रालोआत अस्तित्वात होते, याकडेही अडसूळ यांनी लक्ष वेधले. मंगळवारच्या बैठकीत आम्ही याबाबत पक्षाची भूमिका मोदी यांच्यापुढे मांडली आहे. त्यांनी यावर कोणतेही उत्तर दिले नसले, तरी त्यांना आमची कल्पना मान्य झाली आहे, असेही अडसूळ म्हणाले.

शेअर करा

Posted by on Nov 24 2016. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google