Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » नोटबंदी : विरोधकांचा लोकसभेत गदारोळ

नोटबंदी : विरोधकांचा लोकसभेत गदारोळ

तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, २१ नोव्हेंबर –
loksabha-parliamentपाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे आज चौथ्या दिवशीही संसदेत संतप्त पडसाद उमटले. या मुद्यावरून झालेल्या गोंधळामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.
लोकसभेच्या कामकाजाला आज प्रारंभ होताच कॉंग्रेससह विरोधी पक्षांचे सदस्य घोषणा देत वेलमध्ये आले. नोटबंदीच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी कॉंग्रेस आणि अन्य पक्षांनी स्थगनप्रस्ताव दिला होता. पण सभापती महाजन यांनी हा स्थगनप्रस्ताव फेटाळून लावला. त्यामुळे विरोधी पक्षाचे सदस्य घोषणा देत वेलमध्ये आले. विरोधी पक्षाच्या सदस्यांच्या हातात निषेधाचे फलकही होते. सदस्यांनी शांत राहण्याचे आणि आपल्या जागेवर जाण्याचे आवाहन सुमित्रा महाजन वारंवार करत होत्या. पण सदस्य ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
सभागृहाचे कामकाज स्थगित करून नोटबंदीवर चर्चा करण्याची विरोधी पक्षांची मागणी होती. तर नियम १९३ नुसार चर्चा करण्याची तयारी सरकारने दर्शवली होती. या गोंधळातच सभापती महाजन यांनी प्रश्‍नोत्तराचा तास पुकारला. पण गोंधळामुळे काही ऐकू येत नव्हते. विरोधी सदस्यांची घोषणाबाजी सुरूच होती. त्यामुळे तुम्हाला चर्चा करायची नाही, टीव्हीवर दिसण्यासाठी फक्त गोंधळ घालायचा आहे, असे संतप्त होत महाजन म्हणाल्या. या लोकांचा गोंधळ संपूर्ण देशाला दाखवा, असे निर्देश मी लोकसभा टीव्हीला देत आहे असे महाजन म्हणाल्या. मात्र तरीही विरोधक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
टीव्हीवर दिसायची आमची हौस नाही, नोटबंदीच्या निर्णयामुळे देशातील जनता त्रस्त आहे, त्यावर आम्हाला चर्चा करायची आहे, असे कॉंग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खडगे म्हणाले. सभागृहाचे कामकाज स्थगित करून नियम ५६ नुसार नोटबंदीवर चर्चा व्हावी, अशी सर्व पक्षांची मागणी असल्याचे खडगे म्हणाले. कॉंग्रेस, तृणमूल कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांचे सदस्य वेलमध्ये येत घोषणाबाजी करत होते. या गोंधळामुळे अध्यक्ष महाजन यांनी दहा मिनिटांसाठी कामकाज स्थगित केले.
कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर पुन्हा गोंधळाला प्रारंभ झाला. सदस्यांनी शांत राहण्याचे आणि आपल्या जागेवर जाण्याचे आवाहन सभापती महाजन करत होत्या. तुम्हाला देशातील गरीब जनतेला होत असलेल्या त्रासाचा मुद्दा सभागृहात उपस्थित करायचा असेल तर चर्चा करा, सरकारही चर्चेला तयार आहे, असे त्या म्हणाल्या. मात्र स्थगनप्रस्ताव मी फेटाळला आहे, त्यामुळे त्यावर चर्चा होऊ शकणार नाही, असे महाजन यांनी स्पष्ट केले. तुम्हाला चर्चा करायची नाही तर सभागृहाचे कामकाज ठप्प पाडायचे आहे, असे महाजन म्हणाल्या.
काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी सरकारने नोटबंदीचा निर्णय घेतला आहे, याला देशातील जनतेचा पाठिंबा आहे, मात्र तरीसुध्दा नियम १९३ नुसार सरकार चर्चेला तयार असल्याचे संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी स्पष्ट केले. मानव संसाधन मंत्री प्रकाश जावडेकर प्रश्‍नाचे उत्तर देत असताना विरोधी सदस्य घोषणा देत त्यांच्यासमोर उभे झाले. त्यांनी बाजूला होण्याचे निर्देश महाजन यांनी दिले, पण विरोधी सदस्य तिथेच उभे होत घोषणा देऊ लागले. त्यामुळे महाजन यांनी पुन्हा कामकाज दुपारी २ पर्यंत स्थगित केले. दुपारी २ वाजता कामकाज सुरू झाल्यावर गोंधळ वाढल्यामुळे उपाध्यक्ष थंबीदुराई यांनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले.

शेअर करा

Posted by on Nov 22 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google