Home » ठळक बातम्या, न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय » न्यायपालिकेलाच कुलूप लावायचे का?

न्यायपालिकेलाच कुलूप लावायचे का?

=सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले=
supreme-court_6नवी दिल्ली, [२८ ऑक्टोबर] – न्यायाधीशांच्या नियुक्त्यांवरून केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यातील संघर्ष शुक्रवारी अतिशय तीव्रपणे उफाळून आला. न्यायाधीशांच्या नियुक्त्यांबाबत केंद्र सरकार उदासीन असून, देशातील उच्च न्यायालयांमधील अनेक पदे रिक्त आहेत. उच्च न्यायालयांना कुलूप लावावे लागत आहे. आपल्याला काय संपूर्ण न्यायपालिकेलाच कुलूप लावायचे आहे काय? अशी संतप्त विचारणा करीत सरन्यायाधीश न्या. तीर्थसिंह ठाकूर यांनी केंद्र  सरकारला फटकारले. न्यायाधीशांच्या नियुक्त्या लवकरात लवकर झाल्या नाहीत, तर पंतप्रधान कार्यालयातील सचिव आणि विधि व न्याय मंत्रालयाला समन्स बजावण्यात येईल, अशी तंबीदेखील त्यांनी यावेळी दिली.
सरन्यायाधीश न्या. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय न्यायासनापुढे आज न्यायाधीशांच्या नियुक्त्यांबाबतची याचिका आली असता, न्या. ठाकूर यांनी सरकारवर ताशेरे ओढले. न्या. ठाकूर सरकारवर ताशेरे ओढीत म्हणाले, नऊ महिन्यांपासून तुम्ही न्यायाधीशांच्या नावांची यादी घेऊन बसलेले आहात. आम्ही ७७ नावे आपल्याकडे पाठविली. आतापर्यंत केवळ १८ नावांना मंजुरी देण्यात आली आहे. काही अडचण असेल तर आम्हाला सांगा. आम्ही त्यावर विचार करू. तुम्ही संपूर्ण न्यायपालिकेचे काम ठप्प करू  शकत नाही.
सरकारची बाजू मांडणारे ऍटर्नी जनरल मुकूल रोहतगी यांना न्या. ठाकूर म्हणाले, आम्ही तुम्हाला व्यवस्थेसोबत खेळ करू देणार नाही. न्यायासनापुढे बाजू मांडताना मुकूल रोहतगी म्हणाले मेमोरँडम ऑफ प्रोसीजर निर्धारित झाल्यानंतर नियुक्ती प्रक्रियेस वेग येईल. न्या. धनंजय चंद्रचूड आणि न्या. नागेश्‍वर राव यांचा समावेश असलेल्या न्यायासनाने यावर नाराजी व्यक्त केली. न्यायपालिकेतील न्यायाधीशांची नियुक्ती प्रक्रिया आणि  मेमोरँडम ऑफ प्रोसीजरचा काहीही संबंध नाही, असे न्यायासनाने त्यांना बजावले. ऍटर्नी जनरल मुकूल रोहतगी यांनी याप्रकरणी सुप्रीम कोर्टाकडे नोव्हेंबरपर्यंचा वेळ देण्याची विनंती केली. या प्रकरणी आता पुढील सुनावणी ११ नोव्हेंबर रोजी ठेवण्यात आली आहे.

शेअर करा

Posted by on Oct 29 2016. Filed under ठळक बातम्या, न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google