Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » पाकच्या वधूला सुषमा स्वराज यांची सुखद भेट

पाकच्या वधूला सुषमा स्वराज यांची सुखद भेट

=भारतात येण्यासाठी त्वरित व्हिसा=
sushma-swaraj-afpजोधपूर, [७ नोव्हेंबर] – पाकिस्तानमधील एका तरुणीचे भारतातील तिच्या प्रियकरासोबत लग्न ठरले. मुहूर्तही जवळ आला. पण, भारत आणि पाकमधील तणावामुळे तिला भारताचा व्हिसा मिळण्यात अनेक अडचणी जात होत्या. अखेर या तरुणीने थेट ‘संकटमोचन’ अशी ओळख असलेल्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्या दरबारी आपली फैफियत मांडली आणि सुषमा स्वराज यांनी या नवोदित भारतीय सुनेला लगेच व्हिसा मंजूर करून विवाहाची गोड भेट दिली. आज सोमवारी दोघेही विवाहाच्या अतूट बंधनात अडकले.
राजस्थानच्या जोधपूर येथील नरेश तिवानी या तरुणाचे पाकमधील प्रिया बच्चानी  असे नाव असलेल्या तरुणीवर प्रेम होते. त्यांचा विवाह ठरला होता. विवाहाची तारीख ७ नोव्हेंबर होती. पण, उरी येथील दहशतवादी हल्ला आणि भारतीय जवानांनी केलेला सर्जिकल स्ट्राईक यामुळे गेल्या काही महिन्यांपासून भारत-पाक संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. यामुळे प्रियाला व्हिसा मिळण्यात अडचण येत होती. लग्न जवळ येत असल्याने दोन्ही कुटुंबात काळजीचे वातावरण होते. प्रियाने पाकमधील भारतीय दूतावास आपल्याला व्हिसा देत नसल्याचे ट्विट सुषमा स्वराज यांना केले आणि स्वराज यांनी तातडीने लक्ष घालत प्रिया व तिच्या कुटुंबातील ३५ सदस्यांना तत्काळ व्हिसा मिळवून दिला. रविवारीच व्हिसा मिळण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आणि सायंकाळी तिने परिवारासह जोधपूर गाठले. आज नरेश आणि प्रिया यांचा विवाह सोहळा थाटात संपन्न झाला.
प्रिया म्हणाली, व्हिसाची अडचण दूर झाल्यामुळे रविवारी आम्ही सारेच भारतात दाखल झालो. आज सोमवार आमचा विवाह पार पडला. मी खुप आनंदी आहे. तर, नरेश म्हणाला की, प्रियाने केलेल्या ट्विटची दखल घेत तिला व तिच्या कुटुंबियांना तत्काळ व्हिसा मिळवून दिल्याबद्दल सर्व मंत्र्यांचे विशेषत: सुषमा स्वराज यांचे मनापासून आभार मानतो.
नरेश तिवानी व कराचीत राहणार्‍या प्रियाचा दोन वर्षापूर्वी साखरपुडा झाला होता. एका मॅट्रीमोनी साईटच्या माध्यमातून दोन्ही कुटुंब एकमेकांच्या संपर्कात आले होते. २०१४ मध्ये साखरपुड्यासाठी प्रिया व तिचे कुटुंब जोधपूरला आले होते. तथापि, प्रियाच्या वडिलांनी आपण निवृत्त होईपर्यंत विवाह करणार नाही, असा निर्णय घेतला होता. त्यामुळे विवाहाची तारीख लांबणीवर टाकण्यात आली होती. ऑगस्टमध्ये प्रियाचे वडील निवृत्त झाले आणि लगेच विवाहाची तारीख काढण्यात आली होती. या दोन वर्षांच्या काळात त्यांच्यातील प्रेमाचे नाते अधिकच घट्ट झाले होते. मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून दोघेही एकमेकांच्या सातत्याने संपर्कात होते.

शेअर करा

Posted by on Nov 8 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google