Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » बनावट नोटा, भ्रष्टाचाराविरोधात हे पाऊल: मोदी

बनावट नोटा, भ्रष्टाचाराविरोधात हे पाऊल: मोदी

narendra-modi-3वृत्तसंस्था
नवी दिल्ली, [८ नोव्हेंबर] – काळा पैसा, नकली नोटा आणि भ्रष्टाचाराविरोधात मोठी लढाई छेडताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंगळवारी ५०० आणि एक हजार रुपयांच्या चलनी नोटा व्यवहारातून हद्दपार केल्या. हा निर्णय आज मंगळवारी मध्यरात्रीपासूनच अंमलात आला आहे. काळा पैसा जमा करणार्‍यांसाठी हा आजवरचा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
आज मध्यरात्रीपासून ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटांना कोणतेही मूल्य राहणार नाही. कचर्‍यातील कागदाप्रमाणे त्या नोटा राहतील. तथापि, एक रुपयापासून १०० रुपयांपर्यंतच्या नोटा पूर्वीप्रमाणेच चलनात राहतील. याशिवाय एक रुपया, दोन रुपये, पाच रुपये आणि दहा रुपयांचे नाणेही चलनात राहणार आहेत.
देशभरातील चलनातून ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा हद्दपार झाल्या असल्या तरी नागरिकांनी घाबरून जाण्याचे काही कारण नाही. ते आपल्याजवळील या सर्व नोटा १० नोव्हेंबर ते ३० डिसेंबर या ५० दिवसांच्या कालावधीत आपल्या बँक खात्यात किंवा डाक कार्यालयात जमा करू शकतात. तुमच्याजवळ ५० दिवसांचा वेळ आहे. मुळीच घाई करू नका. भारतीय रिझर्व्ह बँकेतही तुम्ही या नोटा जमा करू शकता, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित करताना सांगितले.
५०० आणि १००० हजार रुपयांच्या नोटा आम्ही चलनातून हद्दपार केल्या असल्या, तरी लवकरच नव्या नोटा चलनात आणण्यात येणार आहेत. तोपर्यंत नागरिक बँकांनी बदलून दिलेल्या चलनाचा वापर करू शकतात. भ्रष्टाचाराविरोधात हे पाऊल उचलण्यात आले असल्याने नागरिकांनी या लढ्यात सहकार्य करावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.
१० नोव्हेंबरपासून ३० डिसेंबरपर्यंत या नोटा जमा केल्यानंतर त्या बदलून घेण्यासाठी आपले ओळखपत्र दाखवावे लागेल, असे सांगताना रुग्णालयांमध्ये ११ नोव्हेंबरच्या रात्री १२ वाजेपर्यंत जुन्या नोटा देण्याची परवानगी राहणार आहे.
भारत चमकता ताराच
‘ब्रिक्स’ राष्ट्रसमूहात (ब्राझिल, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा समूह) जो ‘आय’ शब्द आहे, तो घसरत असल्याचे सदस्य देशांकडून बोलले जात होते. पण, आपल्या सरकारच्या गेल्या दोन वर्षांतील कठोर परिश्रमाने भारताने आज उगवता तार्‍याप्रमाणे आपली उपस्थिती सिद्ध केली. हा दावा केवळ आमचा नसून, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेचेही हेच मत आहे. विकासाच्या या स्पर्धेत ‘सबका साथ सबका विकास’ हाच आमचा मंत्र राहिला आहे. हे सरकार गरिबांसाठी समर्पित असून, सर्वांची सक्रिय भागीदारी, गरिबांचे सक्षमीकरण या प्रयत्नांचे प्रतिबिंब अनेक योजनांमधून दिसून येते. गरिबांसाठी आपल्या सरकारने सुरू केलेल्या जनधन योजना, सुरक्षा योजना, सॉईल हेल्थ कार्ड योजना, पीक विमा योजनांवरून हे सरकार गरिबांसाठीच समर्पित असल्याचे दिसून येते, याकडेही मोदी यांनी लक्ष वेधले.
गेल्या काही काळापासून भ्रष्टाचार, काळा पैसा आणि नकली नोटा यासारख्या आसुरी शक्तींनी देशात आपली पाळेमुळे खोलवर रोवली असल्याचे दिसून आले आहे. देशाच्या विकासात हा सर्वात मोठा अडथळा ठरत आहे. दोन वर्षांपूर्वी भ्रष्टाचाराच्या जागतिक श्रेणीत भारत अतिशय वरच्या क्रमांकावर होता. दोन वर्षांत आम्ही भ्रष्टाचार व काळ्या पैशाचे सर्वच मार्ग बंद केल्याने भारताच्या श्रेणीत आता बरीच सुधारणा झाली आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांनी आपल्या भाषणात दहशतवादाचाही उल्लेख केला. दहशतवादाच्या भयानक रूपाशी आपण सारेच परिचित आहोत. कितीतरी निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आहे. या अतिरेक्यांना सीमेपलीकडील शत्रू नकली नोटांच्या माध्यमातून आर्थिक मदत करीत असतात. अशा अनेक लोकांना आम्ही पकडले आहे. गरिबांच्या विकासात बाधा ठरणारा काळा पैसा देशात परत आणण्यासाठी आम्ही विविध देशांसोबत करार केला. कठोर कायदे तयार केले. देशातही बेहिशेबी संपत्ती बाहेर काढण्यासाठी योजना राबवली. यामुळे सुमारे १.२५ लाख कोटी रुपयांचा काळा पैसा बाहेर आला. काळा पैसा, भ्रष्टाचार, दहशतवादाविरोधात व्यापक लढा लढायलाच हवा, असे प्रामाणिक देशवासीयांचे मत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
२४ तास काम सुरू ठेवणार : स्टेट बँक
चलनी नोटा व्यवहारातून बाद करण्याचा हा काही पहिला प्रसंग नाही. आधीही असे प्रसंग आम्ही व्यवस्थित हाताळले आहे, असे स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्‌टाचार्य यांनी सांगितले. बँक काऊंटर्स तसेच एटीएममधून बाद झालेल्या नोटा काढण्यासाठी ९ नोव्हेंबर रोजी सर्व बँका बंद राहणार आहेत. ग्राहकांना लवकरात लवकर सुरळीत व्यवहार करता यावे म्हणून आम्ही अहोरात्र काम करणार आहोत, असेही त्या म्हणाल्या.
अर्थव्यवस्था मजबूत होणार
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आणि काळा पैसा व भ्रष्टाचारावर आळा घालण्यासोबतच दहशतवाद्यांची आर्थिक नाकेबंदी करण्यासाठी मोदी सरकारचा हा निर्णय ऐतिहासिक असाच आहे, असे मत आरबीआयने व्यक्त केले आहे. आम्ही लवकरच नव्या नोटा चलनात आणणार असल्याचेही आरबीआयने जाहीर केले.
एटीएमवर मर्यादा
या नव्या व्यवस्थेत सुरुवातीला तुम्ही एका दिवसात एका कार्डवर एटीएममधून दोन हजारापर्यंत रुपये काढू शकता. काही दिवसांनंतर एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा वाढवली जाईल, असे पंतप्रधानांनी जाहीर केले.
नव्या नोटा १० नोव्हेंबरपासून
५०० व २०००च्या नव्या नोटा १० नोव्हेंबरपासून चलनात येतील. आम्ही चलनी नोटांचे उत्पादन वाढविले आहे आणि लवकरात लवकर नव्या चलनी नोटा व्यवहारात आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे आश्‍वासन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी सांगितले.
दोन हजार रुपयांची नोट
सरकार ५०० व दोन हजार रुपयांची नवी नोट चलनात आणणार आहे. याबाबतचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेने स्वीकारला आहे. त्याची छपाई लवकरच सुरू होणार असून, देशात प्रथमच दोन हजार रुपयांची नोट चलनात येणार असल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी दिली.
चिंतेचे कारण नाही
आपल्या जवळील ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा जमा करताना घाई-गडबड करू नका, तुमचे पैसे तुमचेच राहणार आहेत, असा दिलासा पंतप्रधानांनी दिला. रुग्णांची असुविधा टाळण्यासाठी पुढील ७२ तास म्हणजे ११ नोव्हेंबरच्या रात्रीपर्यंत डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर औषध खरेदीसाठी पाचशे आणि हजारची नोट स्वीकारली जाणार आहेत. विदेशात प्रवास करीत असलेल्या व्यक्तींना काही महत्त्वाच्या ठिकाणी ११ तारखेपर्यंत पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांनी व्यवहार करण्याची मुदत देण्यात आली आहे.
डेबिट, क्रेडिट कार्डचे व्यवहार कायम
धनादेश, डेबिट, क्रेडिट कार्डने जे व्यवहार आतापर्यंत सुरू आहेत, ते पुढेही असेच कायम राहतील. ऑनलाईन पेमेंटची सुविधाही अशीच सुरू राहणार असल्याचे मोदी म्हणाले. ९ व १० नोव्हेंबर रोजी देशातील एकही एटीएम काम करणार नाही. तसेच उद्या ९ नोव्हेंबर रोजी देशातील सर्व बँका बंद ठेवण्यात येणार आहेत. हा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेचा आहे, अशी माहितीही मोदी यांनी दिली.

शेअर करा

Posted by on Nov 9 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google