Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » भारत-अमेरिका संबंध मजबूत होणार

भारत-अमेरिका संबंध मजबूत होणार

sansad-bhavan-white-houseवॉशिंग्टन, [९ नोव्हेंबर] – डोनॉल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षतेखालील व्हाईट हाऊस भारत आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष ‘फॅन’ असणार आहे. ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले असल्याने आता भारत आणि अमेरिका यांच्यातील धोरणात्मक संबंध आणखी मजबूत होणार असून, दहशतवादविरोधी लढ्यातील सहकार्यही अधिक दृढ होणार आहेत.
ट्रम्प यांनी अलीकडेच भारत हा अमेरिकेसाठी अतिशय महत्त्वाचा भागीदार असल्याचे जाहीर केले होते. भारतासोबत राजकीय सहकार्याचे संबंध वाढविण्यावर आपला विशेष भर राहणार असल्याचे आणि दोन्ही देशांचे हितसंबंध जोपासणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.
पंतप्रधान मोदी यांच्या आर्थिक धोरणांची उत्सफूर्तपणे स्तुती करताना भारतासोबत आर्थिक क्षेत्रात एकत्रित काम करण्याचा आपला मानसही त्यांनी बोलून दाखवला होता.
एक महिन्यापूर्वी न्यू जर्सी येथे आयोजित एका कार्यक्रमात भारतीय समूदायाला संबोधित करताना त्यांनी माझ्या विजयानंतर भारताला व्हाईट हाऊसमध्ये सच्चा मित्र मिळणार असल्याची ग्वाही दिली होती. हिंदू रिपब्लिकन आघाडीतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही असून, हा देश अमेरिकेचा नैसर्गिक मित्र आहे. राष्ट्राध्यक्षपदी माझी निवड झाल्यानंतर उभय देशांमधील मैत्री आणखी मजबूत करण्यावरच व्हाईट हाऊसचा भर राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी आणि त्यांच्यासोबत काम करण्यासाठी मी आतापासूनच आतूर झालो आहे, असे त्यांनी सांगितले होते.
नरेंद्र मोदी हे महान पंतप्रधान आहेत. त्यांच्याजवळ विकासाची दूरदृष्टी असून, विकास हाच त्यांचा ध्यास आहे. त्यांनी कररचना अधिक सुलभ केली आहे. यामुळेच भारताच्या आर्थिक विकासाचा दर सात टक्क्यांपेक्षाही जास्त आहे. मोदी खरोखरच अभिनंदनास पात्र आहेत. अमेरिकन मूल्यांचा भारताने नेहमीच सन्मान केला आहे. आम्हाला केवळ सांस्कृतिक आणि आर्थिक संबंधच बळकट करायचे नाही, तर संरक्षण संबंधही मजबूत करायचे आहेत, असेही या कार्यक्रमात ते म्हणाले होते.

मी हिंदूंचा सर्वात मोठा चाहता
मी हिंदूंचा आणि भारताचा सर्वात मोठा चाहता आहे. माझा व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश झाल्यानंतर भारतीय आणि हिंदू समूदायाला येथे माझ्या रूपात एक चांगला मित्र मिळेल, असे ट्रम्प यांनी एक महिन्यापूर्वी न्यू जर्सी येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना सांगितले होते. कट्टर इस्लामिक दहशतवादाविरोधात लढा देत असलेल्या भारताचा मी मनापासून आभारी आहो. भारत फार आधीपासून दहशतवादाचा शिकार ठरला आहे, असे सांगताना मुंबईवरील २६/११ रोजीचा आणि संसदेवरील २००१ चा दहशतवादी  हल्ला अतिशय भीषण असाच होता, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. या इस्लामिक दहशतवादाचा नाश करणे हाच माझा निर्धार आहे. या लढाईत आम्ही भारतासोबत खांद्याला खांदा लावून उभे राहणार आहोत. इसिससारख्या जहाल दहशतवादी संघटनेचा नाश करण्यासाठी भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्री आणखी मजबूत होणे आवश्यक आहे, असेही त्यांनी जाहीर केले होते.

शेअर करा

Posted by on Nov 10 2016. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google