Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक » मुलांना मातृभाषेसाठी प्रोत्साहित करा

मुलांना मातृभाषेसाठी प्रोत्साहित करा

=इंग्लिश मानसिकतेवर नायडूंचा प्रहार=
venkaiah-naidu_3अहमदाबाद, [८ नोव्हेंबर] – आपल्या मुलांना इंग्रजी बोलण्यासाठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकण्यासाठी प्रवृत्त करणार्‍या माता-पित्यांच्या इंग्लिश मानसिकतेवर केंद्रीय मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी आज जोरदार प्रहार केला. लहान मुलांमध्ये मातृभाषेविषयी प्रेम आणि आदर निर्माण करण्याची गरज नायडू यांनी यावेळी प्रतिपादित केली.
आपल्या मुलांनी मातृभाषेत बोलावे, यासाठी आपण त्यांना प्रोत्साहित करायला हवे. ती मातृभाषा हिंदी, असो, तामिळ, मराठी, मल्याळम्, आसामी, पंजाबी किंवा भोजपुरी असो, मुलांनी याच मातृभाषेत बोलावे, यासाठी प्रोत्साहित करण्याची जबाबदारी आपलीच आहे. ही मातृभाषा आईच्या गर्भातूनच शिकली जाते, असे नायडू यांनी येथे स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमात बोलताना सांगितले.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांनी भारत सोडल्यानंतर ते आपली इंग्लिश मानसिकता येथेच सोडून गेले. याच मानसिकतेतून आपण आपल्या मुलांना आई आणि बाबा याऐवजी मम्मी व डॅडी असे म्हणायला शिकवतो, अशा शब्दात नायडू यांनी या मानसिकतेवर टीका केली. अनेक भारतीय भाषांमध्ये ‘मा’ हा शब्द आपण आईसाठी संबोधित करतो. हा शब्द हृदयातून येत असतो. तिथेच ‘मम्मी’ हा इंग्रजी शब्द केवळ ओठातून निघतो, असे ते म्हणाले.
गुजरातमध्ये गुजराथी ही मातृभाषा असताना, मुलांनी एकमेकांसोबत इंग्रजीतून का बोलावे. त्यांना गुजराथी भाषेचाच वापर करण्यासाठी प्रेरित करायला हवे, असे सांगताना नायडू यांनी चीन, फ्रान्स आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारत भेटीवर आले असता, इंग्रजीचे ज्ञान असतानाही त्यांनी आपल्याच मातृभाषेतून संवाद साधला, याबाबतचे उदाहरण दिले. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक देशांच्या दौर्‍यावर जातात. पण, तिथे ते इंग्रजीऐवजी हिंदीतूनच बोलणे पसंत करतात, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
मी इंग्रजीच्या विरोधात नाही. आपण हिंदीसोबत इंग्रजी भाषा देखील शिकायलाच हवी. पण, सर्वसामान्यपणे बोलताना मुलांनी मातृभाषेचाच वापर करावा, यासाठी आपण त्यांना प्रेरित करायला हवी, असा सल्लाही त्यांनी दिला.

शेअर करा

Posted by on Nov 9 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google