Home » उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य » मोदींसारखा पंतप्रधान मिळणे देशाचे भाग्यच

मोदींसारखा पंतप्रधान मिळणे देशाचे भाग्यच

=नोटबंदीचा निर्णय धाडसी : अमरसिंह यांचा सपाला घरचा अहेर=
वृत्तसंस्था
वाराणसी, २६ नोव्हेंबर –
amar-singh५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घालणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्णय अतिशय धाडसी असाच आहे. काळा पैसा, भ्रष्टाचार आणि नकली चलन पूर्णपणे संपुष्टात आणण्याच्या दिशेने हा एक धाडसी प्रयोगच आहे. मी देखील या देशाचा एक नागरिक आहे आणि नरेंद्र मोदींसारखा पंतप्रधान मिळावा, हे देशवासीयांचे मोठे भाग्यच आहे, अशा शब्दात समाजवादी पार्टीचे राज्यसभेतील सदस्य अमरसिंह यांनी मोदींच्या निर्णयावर टीका करणार्‍या आपल्याच पक्षाला घरचा अहेर दिला.
नोटबंदीचा निर्णय धाडसी आणि योग्य असला, तरी त्याच्या अंमलबजावणीसाठी पाहिजे तशी व्यवस्था झाली नाही. असे असले तरी, अचानक झालेल्या या निर्णयामुळे काळा पैसा पांढरा करण्याचे सर्व मार्ग बंद झाले. अमाप बेनामी संपत्ती असणार्‍या लोकांची चांगलीच तारांबळ उडाली, असे अमरसिंह यांनी येथे एका कार्यक्रमात सांगितले.
मी देखील या देशाचा एक जबाबदार नागरिक आहे आणि एक भारतीय म्हणून मी ठामपणे सांगू इच्छितो की, नरेंद्र मोदी यांच्यासारखा पंतप्रधान लाभावा, हे देशाचे आणि देशवासीयांचे सर्वात मोठे भाग्य आहे. अमाप बेहिशेबी संपत्ती जमा करणार्‍यांना पंतप्रधानांनी मोठी शिक्षा केली आहे. काळा पैसा साठवणारी मंडळी कोणीही असो, ती भाजपाची असो किंवा अन्य पक्षांची, त्यांच्याजवळील अमाप काळा पैसा मोदी यांनी एका रात्रीत रद्दी ठरवला आहे. या लोकांची रात्रीची झोपही उडाली आहे, असे सांगताना, मोदी यांच्या एका निर्णयाने देशभरातील गरीब व श्रीमंत ही पोकळीच कमी करून टाकली आहे. सर्वसामान्य लोकही आता कर बुडविण्याऐवजी कर भरत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे, असा दावा अमरसिंह यांनी केला.
मी भाजपाचा प्रवक्ता नाही. समाजवादी पार्टीचा राज्यसभेतील सदस्य आहे. नोटबंदीच्या मुद्यावर माझ्या पक्षाचे मत काय आहे, याचा माझ्यावर फरक पडत नाही. मला व्यक्तिगत जे वाटते, तेच मी बोलत आहे. असे असले, तरी या धाडसी निर्णयानंतर ज्या प्रकारचे व्यवस्थापन असायला हवे होते, ते करण्यात न आल्याने मी मोदी सरकारच्या सुमार व्यवस्थापनाचा निषेध करतो. लोकांना बँकांमधून पैसा काढताना त्रास होत आहे आणि ते पाहून मला देखील वेदना होत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

शेअर करा

Posted by on Nov 26 2016. Filed under उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google