Home » कृषी, ठळक बातम्या, राष्ट्रीय » रबी हंगामासाठी नाबार्डकडून २१ हजार कोटी

रबी हंगामासाठी नाबार्डकडून २१ हजार कोटी

♦शेतकर्‍यांना आणखी एक मोठा दिलासा
♦डेबिट कार्डच्या वापरावर शुल्क नाही,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २३ नोव्हेंबर –
shaktikanta-das-economic-affairs-secretaryनोटबंदीच्या निर्णयानंतर लोकांना डिजिटल पेमेंटसाठी प्रोत्साहित करण्याकरिता ३१ डिसेंबरपर्यंत डेबिट कार्डच्या वापरावर कोणतेही व्यवहार शुल्क न आकारण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने आज बुधवारी जाहीर केला. सोबतच, रबी हंगामाच्या तोंडावर शेतकर्‍यांनाही मोठा दिलासा दिला. नाबार्डकडून जिल्हा सहकारी बँकांना २१ हजार कोटी रुपयांची तातडीची मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी येथे आयोजित पत्रपरिषदेत याबाबतची माहिती दिली. रबीचा हंगाम लक्षात घेता शेतीकर्ज आणि शेतकर्‍यांच्या इतर आवश्यकतांची पूर्तता नाबार्डच्या माध्यमातून केली जाईल. सर्व जिल्हा बँकांना समान रकमेचे वाटप होईल, याची काळजी घेण्याचा सल्ला नाबार्ड आणि आरबीआयला देण्यात आला असल्याचे शक्तिकांत दास यांनी सांगितलं. सोबतच, बियाणांच्या खरेदीसाठी शेतकर्‍यांकडून ५०० रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारण्याचे आदेशही सरकारी बियाणे विक्री केंद्रांना देण्यात आले असल्याचे दास म्हणाले.
देशातील सुमारे ४० टक्के लहान आणि अल्पभूधारक शेतकरी सहकारी वित्तीय संस्थांकडून कर्ज घेत असतात. ऐन रबीच्या हंगामात अनेक शेतकर्‍यांकडे बियाणे व खतांची खरेदी करण्यासाठी रोख रक्कम नसल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. देशाच्या कृषी क्षेत्राने सलग दोन वर्षे भीषण दुष्काळाच्या कळा सोसल्यानंतर नोटबंदी निर्णयाचा कृषी उत्पादनावर परिणाम व्हायला नको, यासाठीच हे पाऊल उचलण्यात आले आहे, असे दास यांनी स्पष्ट केले.
बँकांमध्ये सध्या चलनाची कमतरता असल्याने नागरिकांनी डेबिट कार्डनेच आपले आर्थिक व्यवहार करावे, यावर सरकारने भर दिला असून, अशा व्यवहारांवर कोणतेही  शुल्क न आकारण्यावर सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँकांचे एकमत झाले आहे, अशी माहिती दास यांनी दिली.
सध्या स्थितीत रुपे क्रेडिट कार्डवर कोणतेही व्यवहार शुल्क आकारले जात नाही. यापुढे ३१ डिसेंबरपर्यंत मास्टरकार्ड आणि व्हिसा यासारख्या आंतरराष्ट्रीय कार्ड नेटवर्क कंपन्यांच्या अन्य डेबिट कार्डांवरील व्यवहारही निशुल्क राहतील, असे दास यांनी सांगितले.

सरकारचे काही महत्त्वपूर्ण निर्णय
– पेटीएम आणि इतर डिजिटल वॉलेटमध्ये २० हजारांपर्यंतची रक्कम जमा करता येईल.
– फोनवरून केलेल्या आर्थिक व्यवहारांवर कोणताही सेवा कर नाही.
– ३१ डिसेंबरपर्यंत रेल्वे तिकिटांच्या बुकिंगवर सरचार्ज लागणार नाही.
– काही दिवसांतच देशातील सर्व एटीएम नियमित सेवा देतील.

शेअर करा

Posted by on Nov 24 2016. Filed under कृषी, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google