Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक » राम नाईक आदर्श राज्यपाल : राष्ट्रपती

राम नाईक आदर्श राज्यपाल : राष्ट्रपती

=‘चरैवेती चरैवेती’ आत्मचरित्राच्या चार भाषातील आवृत्तीचे राष्ट्रपती भवनात प्रकाशन=
ram-naik-and-pranab-mukherjeeतभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, [९ नोव्हेंबर] – गृहमंत्रालय हे राज्यपाल आणि राष्ट्रपती यांच्यातील दुवा आहे. गृहमंत्रालयाने आपल्या कार्यपद्धतीत थोडे बदल केले तर राज्यांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, याकडे उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी माझे लक्ष वेधले. त्यानुसार मी गृहमंत्रालयाशी चर्चा करून असा बदल घडवून आणला आणि यामुळे राज्यातील विविध प्रकारच्या विकास कामांना गती मिळाली, असे गौरवोद्‌गार राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज काढले.
उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या ‘चरैवेती चरैवेती’ या मूळ मराठी भाषेतील आत्मचरित्राचे हिंदी, उर्दू, इंग्रजी आणि गुजराती अशा चार भाषेत अनुवादित पुस्तकांचे प्रकाशन आज राष्ट्रपती भवनात उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी राष्ट्रपती मुखर्जी बोलत होते. लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार उपस्थित होते.
विविध राज्यांशी संबंधित विधेयके गृहमंत्रालयात माध्यमातून राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवतांना गृहमंत्रालयात वर्षानुवर्ष प्रलंबित राहतात. गृहमंत्रालयाने या विधेयकांवर प्रक्रिया करून ती संबंधित मंत्रालयात लवकरात लवकर पाठवून परत बोलवली आणि आणि राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवली तर राज्यांतील विकास कामांना गती येईल, याकडे राम नाईक यांनी माझे लक्ष वेधले. त्यांची ही सूचना अतिशय योग्य अशी होती. त्यामुळे मी गृहमंत्रालयाशी संपर्क साधून या प्रक्रियेत आवश्यक ते बदल करण्याच्या सूचना त्यांना केल्या, असे स्पष्ट करत मुखर्जी म्हणाले की,  गृहमंत्रालयाने या सूचना मान्य करत आपल्या कार्यपद्धतीत सकारात्मक बदल केले. त्यामुळे राज्यांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला, याचे श्रेय राम नाईक यांना आहे.
उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनीही आपल्या भाषणात राज्यपाल राम नाईक यांच्या कर्तृत्वाची प्रशंसा केली. राम नाईक यांच्यासोबत काम करतांना अनेक गोष्टी मला शिकता आल्या, असे लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन म्हणाल्या. राम नाईक आदर्श आणि परिपूर्ण व्यक्तिमत्त्व आहे, आदर्श लोकप्रतिनिधी कसा असतो, हे त्यांनी दाखवून दिले, असे महाजन यांनी स्पष्ट केले.
राम नाईक यांच्याकडे कोणतीही जबाबदारी सोपवा, ते ती पूर्ण जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे पार पाडतात, असे केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटले. मतदारांप्रति असलेले आपले उत्तरदायित्व दाखवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी आपल्या कामाचा अहवाल सादर करण्याचा पायंडा त्यांनी पाडला, असे नायडू म्हणाले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राम नाईक यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. प्रतिकूल परिस्थितीवर संघर्ष करून कशी मात करता येते, हे राम नाईक यांच्यापासून शिकण्यासारखे आहे, असे ते म्हणाले. राम नाईक यांनी आपण कसे घडलो, आणि हे पुस्तक लिहण्याची प्रेरणा आपल्याला कशी मिळाली, याचा आढावा मनोगतातून घेतला. प्रभात प्रकाशनचे पीयूषकुमार यांनी प्रारंभी मान्यवरांचे स्वागत केले, तर प्रभातकुमार यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे संचलन खा. डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी केले.
कार्यक्रमाला राजस्थानचे राज्यपाल ओमप्रकाश कोहली, आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा, दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग, हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, केंद्रीय मानव संसाधन मंत्री प्रकाश जावडेकर, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान आणि ऊर्जा मंत्री पीयूष गोयल, भाजपाचे राष्ट्रीय संघटनमंत्री रामलाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

शेअर करा

Posted by on Nov 10 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google