Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » रेल्वे अपघाताची न्यायवैद्यक चौकशी करणार : सुरेश प्रभू

रेल्वे अपघाताची न्यायवैद्यक चौकशी करणार : सुरेश प्रभू

=दोषींवर कठोर कारवाईचे आश्‍वासन=
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, २१ नोव्हेंबर –
suresh-prabhuकानपूरजवळ झालेल्या रेल्वे अपघाताची न्यायवैद्यक (फोरेन्सिक) चौकशी करण्याची घोषणा करताना या अपघातासाठी दोषी आढळलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची ग्वाही रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज दिली.
कानपूरजवळ झालेल्या रेल्वे अपघाताबाबत लोकसभेत आज स्वत:हून निवेदन करताना रेल्वेमंत्री प्रभू म्हणाले की, हा अपघात अतिशय दुर्दैवी आहे. या अपघातात १३३ प्रवासी मृत्युमुखी पडले असून ५८ गंभीर जखमी आहेत. १२२ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातानंतर तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. मी स्वत: रेल्वेबोर्डाच्या अध्यक्षांसोबत घटनास्थळाचा दौरा केला आणि जखमी प्रवाशांची विचारपूस केली.
मानवीय आधारावर मृतांच्या परिवाराला साडेतीन लाखांची तर गंभीर जखमी प्रवाशांना ५० हजार रुपयांची मदत केली जाईल. जखमींना २५ हजारांची मदत केली जाणार आहे. याशिवाय पंतप्रधान मोदी यांनीही पंतप्रधान निधीतून मृत प्रवाशांच्या निकटवर्तीयांना २ लाखांची तर जखमींना ५० हजारांची मदत देण्यात येईल, असे जाहीर केले आहे, असे प्रभू यांनी स्पष्ट केले.
अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी रेल्वे सुरक्षा आयुक्तांना चौकशीचे आदेश देण्यात आले असून अपघाताच्या कारणांची वेगळी फोरेन्सिक चौकशीही केली जाईल, अपघातासाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची घोषणाही प्रभू यांनी केली. तत्पूर्वी अपघातात बळी पडलेल्या प्रवाशांना सभागृहात श्रध्दांजली वाहण्यात आली. लोकसभेत अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी हा शोकसंदेश वाचून दाखवला.
राज्यसभेत गदारोळ
रेल्वे अपघाताबाबत राज्यसभेत रेल्वे राज्यमंत्री निवेदन करत असतांना कॉंग्रेसचे उपनेते आनंद शर्मा यांनी त्यावर हरकत घेतली. लोकसभेत रेल्वमंत्र्यांनी निवेदन केले, मात्र राज्यसभेत निवेदन करण्यासाठी राज्यमंत्र्यांना पाठवण्यात आले, हा सभागृहाचा अपमान आहे, असे ते म्हणाले. सभागृहात कॅबिनेट मंत्री व राज्यमंत्री कोणीही निवेदन करू शकतो, असे उपाध्यक्ष कुरियन यांनी स्पष्ट केले. मात्र विरोधकांनी घोषणाबाजी केल्यामुळे सभागृहाचे कामकाज स्थगित करावे लागले.

शेअर करा

Posted by on Nov 22 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google