Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » लोकशाहीपूरक भूमिकेमुळे बाजवा यांची लष्करप्रमुखपदी निवड

लोकशाहीपूरक भूमिकेमुळे बाजवा यांची लष्करप्रमुखपदी निवड

=पाकिस्तानातील वृत्तपत्रांचे विश्‍लेषण=
वृत्तसंस्था
इस्लामाबाद, २८ नोव्हेंबर –
kamar-javed-bajwaलोकशाहीपूरक भूमिका आणि प्रसिद्धीच्या झोतात नसलेले व्यक्तिमत्त्व, या दोन गोष्टींमुळे पाकिस्तानचे प्रधानमंत्री नवाझ शरीफ यांनी जनरल कमर बाजवा यांची सेनाप्रमुख म्हणून नियुक्ती केली, असे मत पाकिस्तानातील राजकीय विश्‍लेषक व संरक्षण तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. चार वरिष्ठ जनरल्सना बाजूला सारून पाकिस्तानात अतिशय शक्तिशाली समजल्या जाणार्‍या सेनाप्रमुख पदावर बाजवा यांची नियुक्ती, अनेकांना अनपेक्षित होती.
जनरल राहील शरीफ यांच्या जागी जनरल बाजवा यांची नियुक्ती झाल्यानंतर पाकिस्तानचे प्रमुख वृत्तपत्र- द नेशनने लिहिले आहे की, जनरल बाजवा यांचे जीवनवृत्त काळजीपूर्वक तपासले असता, त्यांची लोकशाहीपूरक भूमिका स्पष्ट होते आणि यामुळेच त्यांची निवड झाली.
पाकिस्तानसारख्या इस्लामी देशात लोकशाहीला पाठिंबा देणारी तसेच लष्करतज्ज्ञ असलेली व्यक्ती सेनाप्रमुखपदी हवी, अशी प्रधानमंत्री नवाझ शरीफ यांची इच्छा होती. शरीफ यांच्या या भूमिकेचे महत्त्व यासाठी आहे की, पाकिस्तान निर्माण झाल्यापासून ७० वर्षांच्या काळात सुमारे अर्धाअधिक काळ हा देश लष्करी हुकूमशाहीतच राहिला आहे.
द डॉन वृत्तपत्रातील विश्‍लेषणात म्हटले आहे की, नागरी सरकाराप्रति जनरल बाजवांची भूमिका नेहमीच मवाळ राहिली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळेच शरीफ यांनी त्यांची निवड केली असावी. नागरी सरकारच्या क्षेत्रात लष्कराने लुडबूड करू नये, या मताचे बाजवा आहेत, असेही या वृत्तपत्राने म्हटले आहे.
निवृत्त लष्करप्रमुख राहील शरीफ यांच्या काळात नागरी-लष्करी समतोल लष्कराकडे कलला होता, असे या वृत्तपत्राने नमूद केले आहे. लष्करप्रमुखपदी जनरल बाजवा यांची पदोन्नती झाल्याने त्यांनी, लेफ्ट. जनरल सईद वाजिद हुसेन (अध्यक्ष, अवजड उद्योग, तक्षशिला), लेफ्ट. जनरल नजिबुल्लाह खान (महासंचालक, संयुक्त स्टाफ मुख्यालय), लेफ्ट. जनरल इशफाक नदीम अहमद (कॉर्प्स कमांडर, मुलतान) व लेफ्ट. जनरल जावेद इक्बाल रामदे (कॉर्प्स कमांडर, बहावलपूर) यांच्यावर मात केली आहे.
शरीफ यांनी जनरल झुबेर मोहम्मद हयात यांना ‘स्टाफ कमिटी’चे संयुक्त प्रमुख म्हणून नियुक्त केले आहे. यातून शरीफ यांना पाकिस्तानातील नागरी सरकार व लष्कर यांच्यातील नाजूक समतोल साधला असल्याचेही मत डॉन वृत्तपत्राने व्यक्त केले आहे.
काही राजकीय विश्‍लेषकांचे म्हणणे आहे की, २०१४ साली नवाझ शरीफ यांच्या सरकारविरुद्ध जो उठाव करण्याचा प्रयत्न झाला, त्यात कमर बाजवा यांनी सरकारपूरक भूमिका घेतली होती. याचाही विचार शरीफ यांनी केला असावा.
पाकिस्तानातील विश्‍लेषण काहीही असले तरी, पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख भारत आणि विशेषत: काश्मीरबाबत कशी भूमिका घेतात, यालाच भारताच्या दृष्टीने महत्त्व आहे. भारतीय उपखंडात शांतता प्रस्थापित होऊन भारत-पाक दरम्यान व्यापारी संबंध सुरळीत करण्याला प्रधानमंत्री नवाझ शरीफ यांचे प्राधान्य असेल आणि तदनुसार पाकिस्तानच्या नव्या लष्करप्रमुखांनी सहकार्य केले, तर ते भारताच्या दृष्टीने चांगले संकेत असतील.

शेअर करा

Posted by on Nov 28 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google