Home » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » सेल्फी मानसिक रोगाचे लक्षणच!

सेल्फी मानसिक रोगाचे लक्षणच!

=एम्सच्या डॉक्टरांचे अभ्यासपूर्ण मत=
selfieनवी दिल्ली, [३१ ऑक्टोबर] – तरुण आणि तरुणींमध्येच नव्हे, तर मोबाईल हाताळता येणार्‍या लहान मुला-मुलींनाही सेल्फीचे आगळेच वेड लागले आहे. कार्यक्रम कोणताही असो, मित्र-मैत्रिणी एकत्र येणे, हॉटेलमध्ये जेवायला जाणे, किंवा मित्राच्या वाढदिवसाची पार्टी असो, सेल्फीचा कार्यक्रम हमखास असतोच. पण, सावधान… कारण, सेल्फी हा एकप्रकारच्या मानसिक रोगाचेच लक्षण असल्याचे एका अभ्यासात सिद्ध झाले आहे.
केवळ कार्यक्रमच नव्हे, तर रस्ता ओलांडताना, रेल्वे गाडीत चढताना, धावत्या रेल्वेगाडीतून बाहेर डोकावताना, धबधब्याच्या काठावर उभे राहून, समुद्रात काहीसे खोलवर जाऊन आणि त्यापेक्षा कळस म्हणजे, अतिशय उंचीवर उभे राहून सेल्फी काढण्याचे प्रचंड वेड तरुणाईला लागले आहे. आतापर्यंत अस्तित्वात नसलेला हा प्रकार इतका का वाढला आहे, तरुण पिढीच्या मनात आहे तरी काय, याचा शोध घेण्यासाठी अ. भा. आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्सने अभ्यास केला असता, हा एक मानसिक रोगच असल्याचे निष्पन्न त्यातून बाहेर आले आहे. दिवसभरात वारंवार सेल्फी घेण्याने माणूस आत्मकेंद्री होतो. किशोरवयीन आणि तरुण वर्गासाठी हा सर्वात घातक रोग आहे, असे एम्समधील तज्ज्ञांच्या अहवालात नमूद आहे.
सेल्फीमुळे लोक आत्मकेंद्री होत आहेत. तसेच, स्वत:ला सुंदर दाखविण्याच्या प्रयत्नात तुम्ही एखाद्या कृत्रिम जगात वावरत असता. तुमच्या कामावर आणि शिकण्याची क्षमतेवरही त्याचा विपरित परिणाम होतो. यातून तुम्ही स्वत:ला नैराश्येच्या गर्तेत ढकलत असता. सेल्फीची सर्वात गंभीर समस्या म्हणजे, तुमच्या सामाजिक वागणुकीवर याचा प्रतिकूल परिणाम होत असतो.
राजधानी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयाचे मनोविशेषज्ञ डॉ. आरती आनंद यांच्या मते, तरुण वयात सेल्फी घेण्याच्या सवयीमुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वावरही परिणाम होतो. कोणत्याही क्षेत्रात पुढे जाण्यात अडथळे निर्माण होतात. अनेकांना कार्यालयात काम करतानाही सेल्फी घेण्याची सवय असते. याचा परिणामही कामावर होत असतो.

शेअर करा

Posted by on Nov 1 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google