Home » ठळक बातम्या, न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय » हाजी अली दर्ग्याच्या मजारपर्यंत महिलांना प्रवेश

हाजी अली दर्ग्याच्या मजारपर्यंत महिलांना प्रवेश

=ट्रस्टची सुप्रीम कोर्टाला ग्वाही=
maharashtra_mumbai_haji-ali-dargahनवी दिल्ली, [२४ ऑक्टोबर] – मुंबईतील हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश देण्याच्या वादावर आज सोमवारी अखेर पडदा पडला. दर्ग्याच्या मजारपर्यंत पुरुषांप्रमाणेच महिलांनाही यापुढे प्रवेश देण्यात येईल, अशी ग्वाही दर्ग्याचे व्यवस्थापन पाहणार्‍या ट्रस्टने सर्वोच्च न्यायालयात दिली. महिलांच्या प्रवेशासाठी आवश्यक ती पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी आम्हाला चार आठवड्यांची मुदत देण्यात यावी, अशी विनंतीही ट्रस्टतर्फे करण्यात आली.
सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर, न्या. डी. वाय. चंद्रचूड आणि न्या. एल. नागेश्‍वर राव यांचा समावेश असलेल्या तीन सदस्यीय न्यायासनाने ट्रस्टला चार आठवड्यांची मुदत मंजूर करताना ही याचिकाही निकाली काढली. यापूर्वी, मुंबई उच्च न्यायालयाने भारतीय मुस्लिम महिला आंदोलनाच्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना, हाजी अली दर्ग्यात पुरुषांप्रमाणेच महिलांनाही समान अधिकार मिळावेत, असा स्पष्ट निकाल दिला होता. हाजी अली ट्रस्टने या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. पण, ट्रस्टने आज स्वत:च अशा प्रकारची नमती भूमिका घेतली.
जिथे पुरुषांना जाण्याची परवानगी आहे, तिथे महिलांनाही जाण्याचा अधिकार आहे, असे स्पष्ट करीत मुंबई उच्च न्यायालयाने २६ ऑगस्ट रोजी हाजी अली दर्ग्यातील महिलांच्या प्रवेशावरील बंदी उठवली होती. विशेष म्हणजे, मुंबईतील हाजी अली दर्ग्याला केवळ मुस्लिमच नव्हे, तर हिंदू देखील पवित्र स्थान मानतात. त्यामुळेच मुस्लिम धर्मीयांबरोबरच येथे हिंदू धर्मातील नागरिकही मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असतात.
यापूर्वी, १७ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या स्थगितीला मुदतवाढ दिली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणार्‍या हाजी अली ट्रस्टने आज्या काळानुसार पुरोगामी भूमिका स्वीकारायला हवी, अशी अपेक्षाही न्यायालयाने व्यक्त केली होती.
१५ व्या शतकातील पवित्र वास्तू असलेल्या या दर्ग्यात महिलांना प्रवेश नाकारताना ट्रस्टने २०११ मध्ये असा युक्तिवाद केला होता की, दर्ग्याच्या गाभार्‍यात महिलांना प्रवेश देणे इस्लामच्या विरोधी आहे आणि घोर पाप आहे.
मासिक पाळीमुळे अपवित्र
मासिक पाळीमुळे महिलांना अपवित्र मानले जाते. त्यामुळे येथे प्रवेशबंदी असल्याचा दावा करीत भारतीय मुस्लिम महिला आंदोलनाच्या सहसंस्थापक नूरजहॉं नियाझ यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मासिक पाळी ही नैसर्गिक क्रिया आहे. मानवजातीच्या जन्मासाठी ही प्रक्रिया आवश्यक आहे. मग महिला अपवित्र किंवा अशुद्ध कशी, असा सवाल नूरजहॉं यांनी केला होता.

शेअर करा

Posted by on Oct 24 2016. Filed under ठळक बातम्या, न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google