Home » ठळक बातम्या, न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय » हिंदुत्वावरील निर्णयाचा पुनर्विचार नाही

हिंदुत्वावरील निर्णयाचा पुनर्विचार नाही

=घटनापीठाचा स्पष्ट निर्वाळा=
supreme_court_2नवी दिल्ली, [२५ ऑक्टोबर] – निवडणूक काळात धर्माचा वापर हा निवडणूक गैरप्रकाराचा भाग ठरू शकतो काय, या मुद्याशी संबंधित याचिकेवर पुनर्विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने आज मंगळवारी स्पष्ट नकार दिला.
१९९५ मधील महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून दाखल एका याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी निकाल दिला होता. ‘हिंदुत्व निकाल’ अशीच त्याची ओळख होती. या क्षणाला आम्ही या निकालाची शहानिशा करणार नाही, असे सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील सात सदस्यीय घटनापीठाने स्पष्ट केले.
हिंदुत्व नेमके काय आहे आणि त्याचा खरा अर्थ काय आहे, यावर आम्ही आता कुठलीही चर्चा करणार नाही. १९९५ मधील आपल्या निर्णयात आम्ही कोणताही बदल करणार नाही, तसेच हिंदुत्व किंवा धर्म या विषयांनाही स्पर्श करणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.
आम्ही या क्षणाला आमच्या समोर जी याचिका आहे, त्यातील मुद्यांवरच विचार करणार आहोत आणि याचिकेतील संदर्भात कुठेही हिंदुत्व किंवा धर्म असा उल्लेख नाही. आमच्यापुढे जे विषय आहेत, त्यात हिंदुत्व असा उल्लेख आहे, असे जर कोणी सांगत असेल किंवा दाखवून देत असेल, तर आम्ही त्याची बाजू नक्कीच ऐकून घेऊ. पण, आमच्यासमोर असलेल्या प्रकरणात कुठेही हिंदुत्वाचा संदर्भ नसल्याने आम्ही निदान आता तरी हिंदुत्वावर कोणतीच भूमिका विशद करणार नाही, असे न्यायालयाने नमूद केले. या घटनापीठात न्या. मदन लोकूर, न्या. शरद बोबडे, न्या. ए. के. गोयल, न्या. उदय ललित, न्या. डी. वाय. चंद्रचूड आणि न्या. एल. नागेश्‍वर राव यांचाही समावेश आहे.
गेल्या मंगळवारीच या मुद्यावर न्यायालयात सुनावणी सुरू झाली होती. आज काही वकिलांनी हिंदुत्व विषयावर सुनावणी करण्याची विनंती केल्यानंतर न्यायालयाने आपली भूमिका स्पष्ट केली. सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांनी ही याचिका दाखल केली आहे. धर्म आणि राजकारण यात अंतर करण्यात यावे. त्यांची सरमिसळ केली जाऊ नये, अशी विनंती याचिकेतून करण्यात आली होती.

शेअर करा

Posted by on Oct 26 2016. Filed under ठळक बातम्या, न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google