Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » ही केवळ सुरुवात आहे!

ही केवळ सुरुवात आहे!

♦भाजपा संसदीय पार्टीच्या बैठकीत मोदींचे संकेत
♦नोटाबंदीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २२ नोव्हेंबर –
BJP  parliamentary party meeting५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करणे हा काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरोधातील लढ्याचा शेवट नसून, ती दीर्घकाळपर्यंत आणि सातत्यता असलेली एक सुरुवात आहे. या निर्णयाचा फायदा सर्वसामान्य आणि गरिबांना नजीकच्या भविष्यात होणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंगळवारी केले.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनातील भाजपा सांसदीय पार्टीच्या पहिल्याच बैठकीला संबोधित करताना पंतप्रधान बोलत होते. ‘एक ऐतिहासिक पाऊल’ अशा शब्दात वर्णन करून बैठकीत सर्वच खासदारांनी या निर्णयाचे समर्थन केले आणि निर्णयावर शिक्कामोर्तब करणारा ठराव एकमताने पारित करण्यात आला.
काळा पैसा, नकली चलन आणि भ्रष्टाचार याचा सर्वाधिक फटका आतापर्यंत सर्वसामान्य जनता आणि अल्पउत्पन्न गटातील नागरिकांनाच बसलेला आहे. देशाला जडलेला हा अतिशय गंभीर आजारच असून, त्यावर कायमस्वरूपी उपाय करताना देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी आपले सरकार सातत्याने कठोर उपाय करीत राहणार आहे, असे नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले.
नोटाबंदीच्या निर्णयाच्या विरोधात एकीकडे सर्वच विरोधी पक्ष एकवटले असताना, बैठकीत भाजपाच्या सर्वच खासदारांनी मात्र मोदींच्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले. या निर्णयावर शिक्कामोर्तब करताना सर्व खासदारांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केला. या ठरावातून विरोधकांवर आसूड ओढताना, ‘आपण देशातील सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी आहोत की काळा पैसा जमा करणार्‍या व भ्रष्ट लोकांच्या पाठीशी आहोत, हे विरोधकांनी आधी स्पष्ट करावे, अशी सूचना करण्यात आली.
भ्रष्टाचारावर प्रहारच : नायडू
या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना संसदीय कामकाज मंत्री एम. व्यंकय्या नायडू म्हणाले की, नोटाबंदीचा निर्णय म्हणजे, भ्रष्टाचार करणारे आणि काळा पैसा जमा करणार्‍यांविरुद्ध घणाघाती प्रहारच आहे. सर्वसामान्य जनतेचे दीर्घकाळ हित जोपासणार्‍या या निर्णयाला मात्र विरोधी पक्ष मुद्दाम विरोध करून, संसदेतील कामकाजाचीही कोंडी करीत आहेत.
आम्ही आमचे किंवा आमच्या जवळच्या लोकांचे हित जोपासण्यासाठी सत्तेवर आलो नाही, तर देशभरातील सर्वसामान्य जनता, गरीब आणि शेतकरी वर्गाचे हित अबाधित राखण्यासाठी सत्तेवर आलो आहोत. गेल्या ७० वर्षांपासून देशातील गरीब जनता आणि अल्प उत्पन्नधारक गटाचे भ्रष्ट व काळा पैसा असणार्‍यांकडून निव्वळ शोषण सुरू आहे. गरिबांचा घामाचा पैसा या लोकांच्या तिजोरीत बंद होता. नकली चलनाचा फायदा दहशतवाद्यांना मिळायचा. याचा फटकाही सर्वसामान्यांनाच बसत आला आहे, याकडेही नायडू यांनी लक्ष वेधले.
सर्जिकल स्ट्राईक म्हणून नका
या बैठकीत बोलताना पंतप्रधान मोदी भावूक झाले. नोटाबंदीचा निर्णय देशहितात असल्याने त्याला सर्जिकल स्ट्राईक असे नाव देऊ नका. या निर्णयामुळे काळा पैसा बाहेर येण्यास मदत होईल आणि भ्रष्टाचारालाही आळा बसेल. भाजपाच्या खासदारांनी जनतेत जाऊन या निर्णयाचे फायदे सांगायला हवे, असे पंतप्रधान म्हणाले.

शेअर करा

Posted by on Nov 23 2016. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google