Home » प.महाराष्ट्र » कराड शहरात रस्त्यांच्या कामांना वेग

कराड शहरात रस्त्यांच्या कामांना वेग

karad-cityतभा विशेष प्रतिनिधी
कराड, [२२ ऑक्टोबर] – नगरपालिका हद्दीत सध्या शहरातील अनेक रस्त्याची कामे वेगाने सुरु आहेत.अक्षरशः रात्रीचा दिवस व दिवसाची रात्र या वेगाने रस्ते डांबरीकरण सुरु झालेले आहे. मुख्याधिकार्‍यांनी नुकतेच ११० कामाच्या कामाचे आदेश काढल्याने या कामाला गती आली आहे.पण सर्वसामान्य जनतेच्या मनात यामुळे अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. एक तर या सर्व कामासाठी इतका निधी पूर्वीच आला होता तर, यापैकी मुख्य नळपाणी पुरवठा योजनमुळे खोदले न जाणारे रस्ते लक्षात घेऊन उर्वरित रस्त्यांची कामे का सुरु करण्यात आली नाहीत हा सर्वात महत्वाचा प्रश्‍न आहे.
१५ मे पासून पावसाच्या कारणाने सर्व रस्त्याची कामे बंद केली अथवा त्यांच्या निविदा प्रक्रिया सुरु होऊन दिल्या नाहीत. प्रशासन व राजकारण दोन्ही राबवणार्‍या व्यक्तीमध्ये दुरावा असेल व संवाद नसेल तर त्याचा नाहक त्रास जनतेला भोगावा लागतो याचे उत्तम उदाहरण याशिवाय दुसरे नाही. जून ते सप्टेंबर या काळात सामान्य लोकांची कराडातील खराब रस्त्यावरून होणारी त्रेधा अनेकांना शारिरीक व मानसिक त्रासातून सहन करत गेली. आता शहरात रोज येणारी सकाळ एक नवीन आश्‍चर्य घेवून येत आहे. चीन देशाला लाजवेल अशा पद्धतीने सुरू असणारी रस्त्याची  कामे हा मोठा विषय आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात सुरु असणार्‍या कामावर देखरेख करायला नगरपालिकेकडे आवश्यक मनुष्यबळ आहे का? १५ वर्षानंतर शहरातील कार्पेटची कामे करण्यास निधी मिळाला आहे म्हणजे, त्या दर्जाची कामे होणे आवश्यक आहे. लाडके आमदार माजी मुख्यमंत्री  पृथ्वीराज चव्हाण यांनी हा निधी आपल्या शहरासाठी दिला असेल तर असाच निधी परत मिळायला अजून किती कालावधी जाईल. नांदेड व लातूर शहरात  अशोक चव्हाण व स्व. विलासराव देशमुख मुख्य्मंत्री असताना ज्या पद्धतीने कामे झाली, याचा अभ्यास शहरातील प्रशासन व पदाधिकार्‍यांनी केला असेलच. रस्त्याची कामे सुरु आहेत ‘देर पण दुरुस्त आये’ असे म्हणायला ती कामे त्या दर्जाची होऊ देत, इतकीच जनतेची अपेक्षा.
प्रशासन व राजकारण यांनी जनतेची सोय व्हावी व सामान्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात याची जाण ठेवून आपआपसातील गैरसमज दूर करून आता सुरु असणार्‍या कामाच्या दर्जावर लक्ष ठेवावे. प्रशासन व लोकप्रतिनिधी हे जनतेला बांधील असतात विकासाबाबत निर्माण होणार्‍या समस्या व निधी उपलब्धी याचा सामना यांना करावा लागतो. ठेकेदार काम करतात व निघुन जातात. त्यांच्या हलगर्जीमुळे निर्माण झालेल्या समस्यांचे उत्तरे लोकप्रतिनिधींना द्यावी लागतात. याचे उत्तम उदाहरण नळ पाणी पुरवठा योजनेतील दिरंगाई, व शहरातील मलःनिसारण योजनेतील कामे होय.
शहरात प्रवेश करताना सुरु असणार्‍या कमानीकडे लक्ष देणारा गाडीवान शंभर टक्के त्याचा पुढे असणार्‍या रस्त्यावरील खड्ड्यात आदळतो व शहरात प्रवेश करतो हे आता या नवीन कामांमुळे थांबेल. पण रस्त्याची कामे दर्जात्मक व्हावीत एवढी माफक अपेक्षा जनतेने ठेवली असेल तर प्रशासन व लोकप्रतीनिधींनी ती सकारात्मक पद्धतीने सोडवणे अपेक्षित आहे. निवडणुकीच्या उंबरठ्यावर शहर चकाचक होणार हे मात्र नक्की.

शेअर करा

Posted by on Oct 23 2016. Filed under प.महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google