‘ओपेक’मधून बाहेर पडणार कतार
4 Dec 2018दोहा (कतार), ३ डिसेंबर –
जगातील सर्वात मोठा नैसर्गिक गॅस निर्यातदार देश असलेल्या कतारने पेट्रोलियम निर्यातदार देशांची संघटना अर्थात् ओपेकमधून बाहेर पडणार असल्याची घोषणा केली आहे. नववर्षाच्या जानेवारी महिन्यात आम्ही ओपेकमधून बाहेर पडू, असे कतारचे ऊर्जामंत्री साद-अल- काबी यांनी आज सोमवारी स्पष्ट केले.
नैसर्गिक गॅस उत्पादनावर अधिक भर देणार असल्याचे सांगत कतारने आंतरराष्ट्रीय स्तरावर दीर्घकालीन धोरण अवलंबिण्याचे ठरविले आहे. या पृष्ठभूमीवर त्यांनी ओपेकमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. कतारमध्ये प्रतिदिनी ६ लाख बॅरेल तेल उत्पादन घेतले जाते. मात्र, हा देश जगातील सर्वात मोठा एलएनजी गॅस निर्यातदार देश आहे. कतार ओपेकमध्ये १९६१ साली सहभागी झाला होता. सध्या ओपेकमध्ये जगातील सर्वांत मोठा तेल उत्पादक देश सौदी अरेबियाचा दबदबा आहे, तर कतार आणि सौदी अरेबियातील द्विपक्षीय संबंध बिघडले आहेत. यादरम्यान, कतारने ओपेकमधून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे.
दरम्यान, अमेरिकासुद्धा तेल उत्पादन वाढवत आहे. अमेरिकेचे तेल उत्पादन प्रतिदिनी ११.५ दशलक्ष बॅरेल पेक्षा अधिक पोहचले आहे. आगामी वर्षात तेल उत्पादन आणखी वाढण्याची शक्यता आहे, तर ओपेकचा सदस्य नसलेल्या रशियामधील तेल उत्पादन नोव्हेंबरमध्ये प्रतिदिनी ११.३७ दशलक्ष बॅरेल एवढे होते. ओपेक सदस्य देश आणि रशिया जगातील एकूण तेल उत्पादनाच्या ४० तेलाचे टक्के उत्पादन घेतात.

Filed under : आंतरराष्ट्रीय, आशिया.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry