करतारपूर कॉरिडॉरचा पाकमध्येही शिलान्यास
29 Nov 2018►हरसिमरत कौर, हरदीप पुरी, सिद्धूची विशेष उपस्थिती,
करतारपूर, २८ नोव्हेंबर –
करतारपूर येथील गुरुद्वारा दरबार साहिब आणि भारताच्या गुरदासपूर जिल्ह्यातील डेरा बाबा नानक गुरुद्वारा यांच्या जोडणार्या बहुप्रतीक्षित करतारपूर कॉरिडॉरचा पाकिस्तानातील शिलान्यास समारंभ आज पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी भारतातील केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल, हरदीप पुरी आणि पंजाबचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू हे या कार्यक्रमाला विशेषत्वाने उपस्थित होते. हा कॉरिडॉर तयार झाल्यानंतर भारतातील शीख भाविकांना करतारपूरस्थित गुरुद्वारा दरबार साहिबपर्यंत व्हिसाविना प्रवास करता येणार आहे. या कॉरिडॉरचे काम सहा महिन्यांत पूर्ण केले जाणार असल्याचे बोलले जात आहे.
करतारपूर येथे शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक देव यांनी शेवटचा श्वास घेतला होता. करतारपूर साहिब पाकिस्तानातील रावी नदीच्या पलीकडे आहे आणि डेरा बाबा नानकपासून सुमारे चार किमी दूर आहे. शीख गुरूंनी १५२२ मध्ये या गुरुद्वाराची स्थापना केली होती. गुरुनानक देव यांची ५५० वी जयंती पुढील वर्षी आहे. भारतातील हजारो शीख भाविक गुरुनानक जयंतीला पाकिस्तानची यात्रा करीत असतात.
भारताने सुमारे २० वर्षांपूर्वी या कॉरिडॉरचा पाकिस्तानला प्रस्ताव दिला होता. गेल्या आठवड्यात भारत आणि पाकिस्तान यांनी जाहीर केले आहे की ते आपापल्या देशातील या कॉरिडॉरचे काम करणार आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये दोन्ही देशांचे संबंध ताणले गेले आहेत, त्यामुळेच की काय दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय चर्चाही झालेली नाही. पाकिस्तानस्थित अतिरेक्यांच्या संघटनेने २०१६ साली दहशतवादी हल्ला केल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहे.
या शिलान्यास समारंभासाठी पाकिस्तानने भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांना आमंत्रित केले होते. त्यासाठी सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानचे विदेश मंत्री शहा महमूद कुरेशी यांना धन्यवाद दिले होते आणि पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे आपण येऊ शकणार नाही, असे कळविले होते.
या कार्यक्रमादरम्यान उपस्थित असलेले माजी क्रिकेटपटू आणि पंजाबचे कॅबिनेट मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांच्याशी यावेळी फक्त हस्तांदोलन केले. याआधी नवज्योत जेव्हा इम्रान खानच्या शपथविधी सोहळ्याला गेले होते, तेव्हा त्यांनी बाजवा यांना अलिंगन दिले होते.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या प्रमुख उपस्थितीत या कॉरिडॉरच्या भारतातील शिलान्यासाचा कार्यक्रम पार पडला.
खलिस्तान अतिरेक्याची उपस्थिती
या कार्यक्रमाला उपस्थित खलिस्तानी अतिरेकी गोपाल चावला याची उपस्थिती आणि त्याने पाकिस्तानचे लष्कर प्रमुख बाजवा यांची घेतलेली भेट वादाचा विषय ठरली आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तातील चित्रफितीत चावला हा बाजवा यांच्यासोबत बोलताना दिसून आला. अन्य एका माहितीनुसार या कार्यक्रमाला दहशतवाद्यांचा सुप्रीम कमांडर हफिज सईदला निकटवर्ती उपस्थित होता.
गुरुनानक यांचे डाक तिकीट, नाणे काढा : हरसिमरत
याप्रसंगी उपस्थित केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर यांनी आपल्या भाषणात, पाकिस्तानने गुरुनानक देव यांच्या स्मृत्यर्थ एक डाक तिकीट जारी करावे आणि एक नाणे तयार करावे, असे आवाहन केले. शांती आणि प्रेमाच्या संदेशाच्या माध्यमातूनच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अविश्वास दूर होऊ शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जर बर्लिनची भिंती तोडली जाऊ शकते तर मग गुरुनानक यांनी दिलेल्या शांती आणि प्रेमाच्या संदेशाने दोन्ही शेजारी देशांमध्येही विश्वासाचे वातावरण तयार होऊ शकते. आज दिवस शीख समुदायासाठीच नव्हे तर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील सरकारसाठीही ऐतिहासिक आहे, असेही त्या म्हणाल्या.
फ्रान्स आणि जर्मनी अनेक युद्ध लढल्यानंतरही अलिकडच्या काळात चांगले संबंध प्रस्थापित करू शकतात, तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातीलही संबंध चांगले होऊ शकतात, असे प्रतिपादन याप्रसंगी बोलताना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले.

Filed under : आंतरराष्ट्रीय, आशिया.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry