फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!
11 Feb 2019वॉशिंग्टन, १० फेब्रुवारी –
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रकृती व्यवस्थित व ठणठणीत असून अध्यक्षपदाचा कार्यकाळ व नंतरही ते तंदुरुस्त राहतील यात शंका नाही, असा निर्वाळा त्यांच्या वार्षिक वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी दिला आहे. ट्रम्प हे मोठ्या प्रमाणात फास्ट फूड खातात, असे असतानाही त्यांची प्रकृती ठणठणीत आहे, हे विशेष मानले जात आहे. ट्रम्प यांची शुक्रवारी चार तास शारीरिक तपासणी करण्यात आली. अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांची पहिली तपासणी जानेवारी २०१७ मध्ये झाली होती. आता ही दुसरी तपासणी करण्यात आली आहे.
वैद्यकीय अहवाल व शिफारशींना अंतिम रूप देण्याचे बाकी असून अध्यक्ष ट्रम्प यांची प्रकृती उत्तम असून अध्यक्षीय काळात व नंतरही ते तंदुरुस्त राहतील, असे अध्यक्षांचे डॉक्टर व नौदल अधिकारी तसेच व्हाईट हाऊसच्या वैद्यकीय पथकाचे संचालक सीन पी. कॉनले यांनी म्हटले आहे. एकूण अकरा विशेषज्ञांनी ट्रम्प यांची चार तास वैद्यकीय तपासणी केली. या तपासणीची सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही. ७२ वर्षांचे ट्रम्प हे धूम्रपान करीत नाहीत पण फास्ट फूड खातात. व्हाईट हाऊस संकुलात ते मोठ्या प्रमाणात चालतात. बर्गर, फ्रेंच फ्राईज, पिझ्झा यावर त्यांचा भर असतो. वॉल्टर रीड नॅशनल मिलिटरी मेडिकल सेंटर या संस्थेत ट्रम्प यांची तपासणी करण्यात आली असून त्याचे निष्कर्ष जाहीर करण्यात आलेले नाहीत. आणखी सविस्तर माहिती देण्यात येणार की नाही, हे सांगण्यात आलेले नाही.
गेल्या वर्षी ट्रम्प यांची तपासणी नौदलाचे रिअर अॅडमिरल रॉनी एल जॅकसन यांनी केली होती. त्यावेळी व्हाईट हाऊसने सविस्तर अहवाल जारी केला होता. ट्रम्प यांची सगळी जनुके चांगली आहेत, असे त्यावेळी सांगण्यात आले होते. ट्रम्प यांना बोधनात्मक चाचणीत पूर्ण गुण मिळाले होते व त्यांनी जेवणाचे नियम पाळले तर दोनशे वर्षेही जगू शकतील, असे जॅकसन यांनी म्हटले होते.

Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry