अमिताभमुळे करिअर धोक्यात आले होते
19 Jan 2017◙पुरस्कारासाठी ३० हजार मोजले होते : ऋषी कपूर,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १८ जानेवारी –
जंजीर चित्रपटामुळे ‘अँग्री यंम मॅन’ अमिताभ बच्चन यांची ओळख झाली आणि माझ्यासह अनेकांची कारकीर्दच धोक्यात आली होती. त्यावेळी चित्रपट सृष्टीतील एक पुरस्कार पदरात पाडून घेण्यासाठी मी ३० हजार रुपये मोजले होते, अशी कबुली ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी दिली.
दिल्लीत ‘खुल्लम-खुल्ला, ऋषि कपूर : अनसेन्सर्ड’ या आत्मचरित्राच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. अमिताभ बच्चन यांच्या चित्रपट सृष्टीतील प्रवेशामुळे माझी संपूर्ण कारकीर्दच अडचणीत आली होती. अवॉर्ड मिळाला नाही, तर आपली कारकीर्द संपेल, अशी भीती त्यावेळी मला सातत्याने वाटत होती. त्याच काळात एका व्यक्तीने माझ्याशी संपर्क साधला आणि ३० हजार रुपये मोजल्यास पुरस्कार मिळवून देतो, असे आश्वासन दिले. यात फसवणूकही शक्य होती. तरी देखील पुरस्कार विकत घेण्यासाठी मी त्याला ३० हजार रुपये मोजले, अशी कबुली ऋषी कपूर यांनी दिली.
तो पुरस्कार फिक्स होता, असे मी मानत नाही. कदाचित तो फिक्स नसावा. संबंधित पुरस्कार मला मिळाला, पण तो ३० हजारांत मिळाला की अभिनयामुळे, हे आजपर्यंत कळू शकले नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
मी प्रणय कथेवर आधारित चित्रपटातून पदार्पण केले, तर अमिताभ बच्चन जंजीरमधून आले. त्याच्या अँग्री यंग मॅनच्या इमेजमुळे सर्व समीकरणेच बदलली होती. कोणाला रोमँटिक नायक नको होता, फक्त ऍक्शन हिरोचीच मागणी होऊ लागली, अशी आठवणही ऋषी कपूर यांनी करून दिली.

Filed under : कलाभारत, ठळक बातम्या.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry