ब्राह्मणच का?
2 Dec 2018॥ टेहळणी : डॉ.परीक्षित स. शेवडे |
नोव्हेंबर २०१८ च्या सुरुवातीस ट्विटर या लोकप्रिय समाजमाध्यमाचा सीईओ जॅक डॉरसे हा भारतभेटीवर आला असताना, त्याची काही छायाचित्रे प्रसारमाध्यमांत चर्चेचा विषय ठरली. यांपैकी एका छायाचित्रात त्याच्या हातात ‘ब्राह्मणी पितृसत्ताक हटवा’ असे लिहिलेला फलक होता. यावरून केवळ भारतातच नव्हे, तर मायदेशीदेखील त्याला टीकेला सामोरे जावे लागले. एकंदर रोष पाहता, जातिविशेषाचा कोणताही अवमान करण्याचा आमचा उद्देश नसून हे ट्विटरचे मत नसल्याचे ट्विटरला जाहीर करावे लागले. विशेष म्हणजे, जॅकच्या या कृत्यावर टीका करण्यास ब्राह्मण समाजाव्यातिरिक्त अन्य ज्ञातीतील लोक आघाडीवर होते! हा प्रश्न एका फलकाचा नसून वर्षानुवर्षे जे असत्य आमच्या माथी मारले गेले त्या असत्याचा आहे. हे असत्य म्हणजे ब्राह्मणवाद. आम्हाला ब्राह्मण जातीस विरोध करायचा नसून ब्राह्मणी प्रथांना आमचा विरोध आहे. हा युक्तिवाद म्हणजे राजाबाबत मला आदर आहे, माझा विरोध राजेशाहीला आहे. किंवा माझे माझ्या आईवर प्रेम आहे, मात्र मला तिचे मातृत्व मान्य नाही. या वाक्यांसारखीच शब्दच्छलयुक्त मखलाशी आहे. ब्राह्मण्य, ब्राह्मणवाद, ब्राह्मणशाही या संकल्पना समाजात जाणीवपूर्वक रुजवल्या गेल्याचे गेल्या पन्नास वर्षांतील; त्यातही गेल्या वीस वर्षांतील इतिहास पाहता प्रकर्षाने जाणवते.
ब्राह्मणच का? या प्रश्नाचे उत्तर शोधताना काही कारणे सापडतात, ती आवर्जून वाचकांसमोर मांडत आहे :
१)ब्राह्मण समाजाची एकूण लोकसंख्या सरासरी ३-४टक्के इतकीच आहे. थोडक्यात, हा अल्पसंख्यक समाज आहे, पूर्वीपासूनच होता! मतपेटीच्या राजकारणात इतक्या लोकसंख्येला काहीही किंमत नसते हे जगजाहीर असल्याने, या समाजावर होणार्या अन्यायाकडे लक्ष द्यावे असे राजकारण्यांना वाटत नाही. लोकसंख्या कमी असल्यानेच त्यांना सहज दाबता येईल, त्यांचा आवाज दडपता येईल, हा ठाम समज असतो.
२)आपल्यावरील अन्यायाबाबत, विखारी प्रचाराबाबत आजही ब्राह्मण समाज हा गंभीर नाही. बहुतांशी उच्च शिक्षित असल्याने स्वाभाविक नम्रता अंगी असलेला हा समाज आढळून येतो. त्यामुळेच की काय कदाचित, या जातीबद्दल वाट्टेल तशी विधाने केलेला चित्रपट आपल्या चित्रपटगृहात लावला तर दगडच कशाला, एक खडादेखील आपल्या दिशेने भिरकावला जाणार नाही, याची चित्रपटगृहाच्या मालकाला खात्री असते. म्हणजेच हा समाज ीेषीं ींरीसशीं आहे.
३)अमेरिकन विचारवंत डॉ. डेव्हिड फ्राउली यांनी एक महत्त्वाचे मत नुकतेच व्यक्त केले. ते म्हणतात, सत्ता हा क्षत्रियांचा अधिकार, व्यवसाय हा वैश्यांचा आणि ज्ञानार्जन-दान हे ब्राह्मणांचे क्षेत्र, अशी व्यवस्था भारतवर्षात होती. या स्थितीत सत्ता आणि संपत्ती हे दोन्हीही हाती नसलेल्या समाजावर अधिकाराचा गैरवापर केल्याची आगपाखड का केली जावी? डॉ. डेव्हिड यांचा मुद्दा अगदीच रास्त आहे. या समाजावर आगपाखड केली जाण्याचे प्रमुख कारण म्हणजे, धर्म म्हणून अस्तित्व जपण्यातील त्यांचे योगदान. शास्त्र, संस्कार, व्रत-वैकल्ये, पूजा-अर्चा आदी धर्माच्या प्रतीकांत ब्राह्मण समाजाचे स्थान हे महत्त्वाचे होते. धर्म कमकुवत करायचा असल्यास त्यावरच घाला घालणे आवश्यक असल्याने परकीय आक्रमकांनी ब्राह्मणांवर अत्याचार सुरू केले. गोव्यातील पोर्तुगीज ख्रिश्चन धर्मसभांच्या काळाचे उदाहरण घेऊ. या काळात, सर्वप्रथम गावातील मंदिरातील पुजार्याला गावाबाहेर हाकलून देण्यात येई. जेणेकरून त्याने प्रबोधन करून तेथील गावकर्यांना एकत्रित करू नये. अल्पावधीतच गावाचे धर्मांतर करण्यात येई. न जुमानणार्या लोकांना भयानक शिक्षांना सामोरे जावे लागे. पुढे ब्रिटिशांनी बुद्धिभेद घडवत ब्राह्मणद्वेषाची बीजे पेरण्यास सुरुवात केली. आज या वृक्षाला लागलेली फळे सर्वत्र दिसत आहेत.
कोणताही समकालीन पुरावा नसताना; ब्राह्मण समाजाबद्दल गैरसमज कसे रुजवले गेले, याची दोन उदाहरणे पाहू. चार्वाकाला तत्कालीन ब्राह्मणांनी ठार केले, अशी थाप बरेच जण मारतात. मुळात चार्वाक नावाचा कुणीही माणूस कधीच अस्तित्वात आल्याचा एकही समकालीन पुरावा नाही. चार्वाक हे माणसाचे नसून परंपरेचे नाव आहे, तरीही बिनदिक्कतपणे खोटे बोलले जाते, स्वीकारले जाते! सुश्रुताने पहिल्यांदा शवविच्छेदन केले तेव्हा तत्कालीन ब्राह्मणांनी प्रचंड विरोध केला, असे विधान मध्यंतरी एका तथाकथित पुरोगामी विचारवंताने केले. हे विधान करताना कोणताही संदर्भ देण्यात आलेला नव्हता. मी स्वतः आयुर्वेद आणि इतिहास या दोन्हीचा विद्यार्थी आहे. असा कोणताच संदर्भ आयुर्वेदाच्या इतिहासात सापडत नाही. समकालीन संदर्भ नसताना किती बिनधास्तपणे खोटे बोलले जावे, याचा हा उत्तम नमुना आहे.
यानंतर येतात ते सोयीचे संदर्भ देणारे. कृष्णाजी भास्कर कुलकर्णी नामक कोणी अफझल खानाचा वकील होता हे सांगत, ब्राह्मण हे स्वराज्याचे शत्रू होते, असे भासवले जाते. मात्र, त्याच वेळी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचा वकील हा पंताजी गोपीनाथ बोकील म्हणजे ब्राह्मणच होता, हे गैरसोयीचे असल्याने दडवले जाते. ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो? हे महाराजांचे वाक्य आमच्या डोक्यात भिनवले जाते; मात्र त्याच वेळी तुकाराम सुभेदारांना लिहिलेल्या पत्रात ‘बापुजी नलावडे यांच्याबाबत ब्राह्मणावर तरवार केली याचा नतीजा तो पावला,’ असे महाराजांनी लिहिलेले वाक्य आमच्या समोर येऊ दिले जात नाही. अशी असंख्य उदाहरणे देता येतील, विस्तारभयास्तव थांबतो. प्रत्यक्षात ब्राह्मण समाजाच्या माथी मारलेल्या पापांपैकी त्यांनी नेमकी किती केली आहेत, हे जाणून घ्यायचे असल्यास तटस्थपणे समकालीन पुरावे शोधा. मी ब्राह्मणवादाला मिथक का म्हटले, हे सहज लक्षात येईल. ब्राह्मणांचे काही चुकले नाही, असे म्हणणेही धारिष्ट्य असेल. पण, चुका कोणी केलेल्या नाहीत? चुकतो तो माणूस, जात नव्हे. दहशतवादाला धर्म नसतो, अत्याचाराला मात्र जात असते, हा युक्तिवाद हास्यास्पद वाटत नाही का?
जॅक डॉरसे वादाबद्दल बोलताना काँग्रेसनेते मनीष तिवारी म्हणाले, ब्राह्मणद्वेष हे भारतीय राजकारणाचे वास्तव आहे. आपण नवे ज्यू आहोत आणि ते स्वीकारून आपण जगायला हवे. हा ब्राह्मणद्वेष नेमका कोणी पोसला, हेही तिवारींनी सांगितले असते तर आम्हाला अधिक आवडले असते. साडेतीनशे वर्षे आमच्यावर अत्याचार करणार्या मुघलांच्या अत्याचाराबाबत आजच्या मुसलमानांना उत्तरदायी ठरवणे वा दीडशे वर्षे आमच्यावर जुलूम करणार्या ब्रिटिशांच्या अन्यायाकरिता आजच्या ब्रिटिशांना जबाबदार ठरवणे हे अत्यंत अनाठायी. हाच न्याय लावता, भूतकाळातील सांगोवांगी अत्याचारांसाठी आजच्या ब्राह्मण समाजाचा सतत द्वेष करण्यात कोण शहाणपण?