भारतातील ४३ टक्के ज्येष्ठांना मानसिक समस्या
3 Aug 2018►एकाकीपणा, इतर नातेसंबंधांमुळे त्रस्त
►एजवेल फाऊंडेशनच्या अध्ययनाचा निष्कर्ष,
नवी दिल्ली, २ ऑगस्ट –
भारतातील १०० पैकी ४३ ज्येष्ठ नागरिक एकाकीपणा आणि इतर नातेसंबंधांच्या कारणांमुळे मानसिक समस्यांनी पीडित असल्याचे एका अध्ययनात म्हटले आहे.
याच वर्षीच्या जून व जुलै महिन्यात देशभरातील सुमारे ५० हजार ज्येष्ठ नागरिकांच्या सर्वेक्षणातील अभिप्रायावरून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. एजवेल फाऊंडेशनच्या या अध्ययनात जवळपास ५० टक्के वयस्कर लोकसंख्येची त्यांच्या कुटुंबीयांकडून काळजी घेतली जात नसल्याचे उघड झाले आहे. या अध्ययनाच्या निष्कर्षात म्हटले आहे की, एकाकीपणा आणि नातेसंबंधांमुळे ४३ टक्के ज्येष्ठ व्यक्तींना मानसिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. एवढेच नव्हे तर, ४५ टक्केज्येष्ठांनी, कुटुंबातील सदस्य त्यांच्या गरजा आणि आवडींची काळजी घेत नसल्याचा दावा केल्याचे स्पष्ट झाले, असे यात नमूद आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याण व सक्षमीकरणाच्या उद्देशाने शासकीय योजनांमध्ये तरतूद करावी, असे आवाहन फाऊंडेशनने सरकार आणि अन्य सामाजिक घटकांना केले आहे.
सर्व शासकीय योजना आणि कार्यक्रमांमध्ये ज्येष्ठांसाठी अनुकूल तरतुदी समाविष्ट करण्याची आज नितांत गरज आहे. देशाच्या लोकसंख्येतील ज्येष्ठ नागरिकांचा आयुष्य काळ आणि त्यांचा सहभाग असामान्यपणे वाढत आहे. त्यांच्या गरजा आणि हक्कांकडे दुर्लक्ष करणे तसेच त्यांना वाळीत टाकणेे आपल्या सामाजिक अजेंड्याला फार मोठा धोका ठरू शकतो. त्यांच्या मुद्यांवर लक्ष केंद्रित करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे. त्यांचा समाजातील सक्रिय सहभाग वाढवण्यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे, असे एजवेल फाऊंडेशनचे अध्यक्ष हिमांशु रथ यांनी सांगितले.
देशभरातील जलदगतीने बदलणारी सामाजिक-आर्थिक परिस्थिती आणि लोकसंख्याविषयक संक्रमणाच्या वातावरणात ज्येष्ठ नागरिक सर्वात प्रभावित घटक ठरत आहे. ज्येष्ठ लोकांशी संबंधिीत समस्या आम्हा सर्वांसाठी फार मोठे आव्हान आहे. आधुनिक मूल्ये आपल्या हजारो वर्षे जुन्या परंपरांची जागा घेत आहेत. आताच्या आधुनिक गतिमान जीवनशैलीत त्यांना जुळवून घेणे कठीण जात आहे, याकडेही रथ यांनी लक्ष वेधले आहे.
फाऊंडेशनने म्हटले की, वयोवृद्धांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची गरज आहे. ६० वर्षांवरील नागरिकांना आर्थिक स्वातंत्र्य मिळणे महत्त्वाचे ठरते. उतार वयात एकाकी आयुष्य जगणार्यांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्यावी. अ.भा.आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) धर्तीवर राष्ट्रीय संस्था स्थापन करून ज्येष्ठ नागरिकांच्या उपचार आणि वयाशी संबंधिीत आजारावर संशोधन होण्याची गरज आहे. तसेच राष्ट्रीय ग्रामविकास निधीप्रमाणे वृद्धांसाठी निधीची तरतूद होणे आवश्यक आहे, असे उपायसुद्धा सुचवले आहे. हिमांशु रथ यांनी सांगितले की, ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय आयोग स्थापन करावा. वृद्धांकरिता पंतप्रधान स्वयंरोजगार योजना सुरू करावी. याद्वारे सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांना कामाची संधी मिळेल आणि त्यांचा एकाकीपणा संपेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. (वृत्तसंस्था)