केंद्रीय पथक आजपासून दुष्काळी जिल्ह्यांच्या दौर्यावर
5 Dec 2018►दोन दिवस करणार पाहणी,
मुंबई, ४ डिसेंबर –
महाराष्ट्रातील दुष्काळी जिल्ह्यांच्या पाहणीसाठी केंद्र सरकारचे १० सदस्यीय पथक आज मुंबईत दाखल झाले. उद्यपासून दोन दिवस हे पथक विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रातील दुष्काळाची भीषणता जाणून घेतील आणि तसा अहवाल केंद्र सरकारला सादर करतील.
राज्यातील सर्व दुष्काळी भागांची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यातील अधिकार्यांच्या सहभागाने तीन चमूंमध्ये विभागले जाणार आहे. दुष्काळाची पाहणी झाल्यानंतर गुरुवारी सायंकाळी या पथकाची विभागीय अधिकार्यांसोबत मुंबईत किंवा पुण्यात संयुक्त बैठक होणार आहे, अशी माहिती राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागातील वरिष्ठ अधिकार्याने दिली.
महाराष्ट्रातील शेतकर्यांना केंद्र सरकारकडून दुष्काळ निधी जाहीर करण्यापूर्वी नेमक्या नुकसानीचा आढावा घेण्याच्या प्रथेनुसार ही भेट असल्याचे अधिकारी म्हणाला. या पथकाला राज्य सरकारकडून मान्सूनच्या पावसाची सरासरी, पीक पद्धत आणि स्थानिक महसूल अधिकार्यांनी यापूर्वी घेतलेल्या प्राथमिक नुकसानीचा अहवाल सादर केला जाणार आहे.
या पथकातील सदस्य प्रत्येक जिल्ह्यात दुष्काळाचा फटका बसलेल्या काही शेतकर्यांसोबतही प्रत्यक्ष चर्चा करणार आहे. याशिवाय, ते मंत्री आणि महसूल व कृषी अधिकार्यांसोबतही चर्चा करतील, असेही अधिकार्याने सांगितले.
राज्य सरकारने यापूर्वीच ७,५२२ कोटींचा दुष्काळनिधी मिळावा, यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला आहे. राज्य सरकारने एकूण १५१ तालुके आणि २० महसुली मंडळ दुष्काळसदृश घोषित केले आहेत. दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या २६ जिल्ह्यांमधील १५१ तालुक्यांपैकी ११२ तालुक्यांत गंभीर स्वरूपाचा, तर ३९ तालुक्यांत मध्यम स्वरूपाचा दुष्काळ पडला आहे. गंभीर स्वरुपाचा दुष्काळ जाहीर झालेले विदर्भातील काही तालुके असे : मोर्शी, खामगाव, लोणार, नांदुरा, संग्रामपूर, शेगाव, मलकापूर, सिंदखेड राजा, बाभुळगाव, दारव्हा, कळंब, महागाव, उमरखेड, राळेगाव, चिमूर, काटोल आणि कळमेश्वर. तर मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये बाळापूर, बार्शिटाकळी, मूर्तिजापूर, तेल्हारा, अकोला, अचलपूर, चिखलदरा, वरूड, अंजनगाव सुर्जी, मोताळा, रिसोड, केलापूर, मारेगाव, यवतमाळ, ब्रह्मपुरी, नागभीड, राजुरा, सिंदेवाही, नरखेड, आष्टी आणि कारंजा यांचा समावेश आहे.

Filed under : महाराष्ट्र.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry