ढोंगी विरोधकांचे समाजात फूट पाडून मतांचे राजकारण
28 Nov 2018►मुख्यमंत्र्यांचा जोरदार हल्ला,
मुंबई, २७ नोव्हेंबर –
विरोधकांच्या मनात काळेबेरे असून ते ढोंगी आहेत. मागासवर्ग आयोगाचा अहवाल मांडून दोन समाजात तेढ निर्माण करायचा आहे. मराठा आरक्षणाच्या विधेयकापूर्वी कृती अहवाल मांडणार असून, धनगर, मुस्लिम, मराठा आरक्षण देऊ. विरोधकांनी राजकारण करू नये, अन्यथा आम्हीही राजकीय उत्तर देऊ, असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंगळवारी विधानसभेत विरोधकांवर केला.
विरोधक मताचे राजकारण करून मुस्लिमांना फसवायला निघाले आहेत. आरक्षणावर विरोधक मुस्लिम समाजाच्या भावना भडकावण्याचे काम करीत आहेत, तर दुसरीकडे मराठा समाजाच्या भावना देखील भडकावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. विरोधकांना समस्येचे निराकरण नको तर, समाजात भांडणे लावून आपली राजकीय पोळी शेकायची आहे. असा घणाघात मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.
विरोधकांनी सकाळपासून आरक्षणावरून सरकारला लक्ष्य केल्याने सभापतींच्या दालनात झालेली गटनेत्यांची बैठक निष्फळ ठरली. विरोधक सभागृहात अहवाल मांडण्याच्या भूमिकेवर ठाम होते.
मुख्यमंत्री म्हणाले, राज्य सरकार नियमाने कार्यवाही करीत आहे. मागास आयोगाच्या अहवालाच्या कार्यकक्षा निश्चित आहेत. कायद्याने मागास आयोगाच्या अहवालावर वार्षिक अहवाल द्यावाच लागणार आहे. कृती अहवाल आणि शिफारसी स्वीकारल्या किंवा नाकारल्या तरी विधिमंडळात मांड्याव्याच लागतील. मराठा आरक्षण विधेयकापूर्वी कृती अहवाल सभागृहात मांडण्यात येईल. तसेच, धनगर समाजाचा अहवाल शिफारसीसह केंद्राला पाठवण्यात येईल. राज्यात सध्या ५० टक्के आरक्षण आहे, ५२ टक्के नाही, त्यामुळे एसईबीसीचे २ टक्के आरक्षण जिवंत आहे. ५२ टक्के आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण देणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
तत्पूर्वी, विखे पाटील म्हणाले, मागास आयोगाचा अहवाल सभागृहात मांडा. १ डिसेंबरचा जल्लोष कसा साजरा करणार ते सांगा, गटनेत्यांच्या बैठकीत विरोधकांची मागणी मान्य का मान्य केली नाही. मुख्यमंत्री म्हणतात, आतापर्यंत किती अहवाल सभागृहात सादर केले ते सांगा. त्यावेळी मागणीच नव्हती म्हणून त्यावेळचे अहवाल मांडले नाही, असे त्यांनी सांगितले. मराठा समाजाचे शांततापूर्ण विशाल मोर्चे निघाले. अहवाल येऊनही सरकार अहवाल का मांडत नाही. संदिग्धता दूर करण्यासाठी अहवाल आणि कृती अहवाल आणि विधेयक मांडलेच पाहिजे. विरोधक पाठिंबा देतील. मागास आयोगाचा अहवाल, टीसचा अहवाल आणि मुस्लिम आरक्षण लागू करण्याची विखे पाटील यांनी मागणी केली.
राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार म्हणाले, विरोधक टोकाची भूमिका घेत नाहीत. आरक्षणासाठी विशाल मोर्चे निघाले. राणे समितीच्या अहवालावरील आरक्षण टिकले नाही. मागास आयोगाच्या अहवालात काय आहे, हे सर्वांना समजले पाहिजे. मराठा समाजाच्या आंदोलकांची धरपकड केली. अजूनही गुन्हे मागे घेतले नाही. धरपकड सुरुच आहे. विरोधक आरक्षणात खोडा घालत आहेत हा आमच्याबाबतीत खोटा प्रचार आहे. जे आरक्षण आम्हीच देणार होतो. ते तांत्रिक अडचणींमुळे दुर्दैवाने न्यायालयात अडकले. आरक्षणासाठी आमचे सरकार असताना आम्हीच पुढाकार घेतला असताना, आम्ही कशाला खोडा घालू, असा खुलासा देखील त्यांनी यावेळी केला.

Filed under : महाराष्ट्र.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry