सावरकरांच्या बदनामीप्रकरणी राहुल गांधींविरोधात तक्रार
15 Nov 2018मुंबई, १४ नोव्हेंबर –
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत बदनामीकारक वक्तव्ये करीत असतात. नुकतेच छत्तीसगडच्या जगदलपूर येथील जाहीर सभेत त्यांनी पुन्हा एकदा सावरकरांबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप करीत सावरकर यांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटिशांची हात जोडून माफी मागितली, असे वक्तव्य करून राहुल गांधी यांनी एका थोर क्रांतिकारकाचा अवमान केला आहे. त्यांच्या वक्तव्याने देशभक्त जनतेची मने दुखावली गेली आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात त्वरित कारवाई करावी, अशी मागणी रणजित सावरकर यांनी केली आहे. सावरकरांनी अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. आपलीच नव्हे तर, अन्य क्रांतिकारकांचीही सुटका व्हावी यासाठी अर्ज केले. कारागृहातून कुठल्याही प्रकारे सुटका करून घेऊन आपले कार्य चालू ठेवणे, ही सर्वच क्रांतिकारकांची रणनीती होती. सावरकरांप्रमाणेच सर्वांनीच सरकारी अटी मान्य करून सुटका करून घेतली व पुढे काम सुरू ठेवले, असे रणजित सावरकर यांच्या तक्रारीत नमूद आहे.
याबाबत पुराव्यांसह स्पष्टीकरण देऊनही काँग्रेसकडून सावरकरांची बदनामी केली जात असल्याचेही त्यांनी म्हटले. सावरकर अंदमानात असतानाच त्यांचा युरोपमधील क्रांतिकारकांशी संपर्क असल्याचा ब्रिटिश गुप्तचर खात्याचा अहवाल आहे. तत्कालीन गृहमंत्री सर रेजिनॉल्ड क्रेडॉक यांनी सावरकरांच्या अर्जात खेद अथवा खंत नसल्याचे नोंदवत सावरकर अत्यंत धोकादायक कैदी असल्यामुळे त्यांना अंदमानात डांबून ठेवणे भाग असल्याचे म्हटले आहे. त्याप्रमाणे ब्रिटिशांनी सावरकरांना एकूण १४ वर्षे कारागृहात आणि नंतर १३ वर्षे रत्नागिरीत स्थानबद्ध करून ठेवले होते. असे असतानाही राहुल गांधी यांनी जाणीवपूर्वक स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटिशांची हात जोडून माफी मागितली, असे विधान करून त्यांचा अपमान केला आहे, असेही ते म्हणाले.

Filed under : मुंबई-कोकण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry