हिंदू विवाहाला विदेशातील न्यायालय घटस्फोट देऊ शकत नाही
1 Feb 2019•मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा,
मुंबई, ३१ जानेवारी –
भारतात हिंदू पद्धतीने आणि हिंदू विवाह कायद्यांतर्गत पार पडलेल्या विवाहाला विदेशातील न्यायालय घटस्फोट मंजूर करू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला.
मुंबईच्या मीरारोड भागातील एका महिलेशी संबंधित हे प्रकरणात आहे. इंग्लंडमधील कुटुंब न्यायालयाद्वारे या महिलेच्या पतीने पाठविलेल्या घटस्फोटाच्या नोटीसच्या विरोधात महिलेने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तिच्या याचिकेवर न्या. आर. डी. धनुका यांच्या एकल पीठाने नुकताच हा निकाल दिला.
मीरारोड येथे राहणार्या महिलेचा डिसेंबर २०१२ मध्ये इंग्लंडमध्ये स्थायिक असलेल्या पुरुषासोबत भारतीय पद्धतीने विवाह पार झाला. मीरा भाईंदर महानगर पालिकेत जानेवारी २०१३ मध्ये या विवाहाची अधिकृत नोंद करण्यात आली. लग्नानंतर तिचा नवरा इंग्लंडला निघून गेला. जुलै २०१३ मध्ये त्याने आपल्या पत्नीला इंग्लंडमध्ये बोलावून घेतले. तिथे गेल्यानतंर काही दिवसातच नवर्याने तिला त्रास देणे सुरू केले आणि भारतात परतण्याची जबरदस्ती केली. नवर्याच्या जाचाला कंटाळून अखेर ती नोव्हेंबर २०१३ मध्ये भारतात परतली. त्यानंतर त्याने जून २०१४ मध्ये महिलेला इंग्लंडमधील कौटुंबिक न्यायालयाकडून घटस्फोटाची कायदेशीर नोटीस बजावली. नोटीस प्राप्त होताच महिलेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.
हिंदू विवाह कायद्यानुसार विवाह झाला असल्यामुळे विदेशातील न्यायालयात घटस्फोट घेता येऊ शकत नाही. आमचा विवाह भारतात झालेला असल्यामुळे घटस्फोटाची प्रक्रिया देखील भारतात होणे बंधनकारक असल्याचे या महिलेले याचिकेत नमूद केले. तिच्या भूमिकेला पतीच्या वकिलाने विरोध केला. महिलेचा पती विदेशी नागरिक असल्याने, त्याला हिंदू विवाह कायदा आणि त्यातील तरतुदी लागू होत नाही, असा युक्तिवाद त्याने केला. यावर प्रतिवादी हा विदेशी नागरिक असला तरी त्याचा विवाह भारतात हिंदू पद्धतीने झाला आहे. त्यामुळे त्याला हिंदू विवाह कायदा, १९५५ च्या कलम १९ अन्वये या सुनावणीतून वगळता येणार नाही, असे स्पष्ट करीत, महिलेने दाखल केलेली याचिका न्यायालयाने मंजूर केली.

Filed under : मुंबई-कोकण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry