संघ कार्यालय समाजाच्या निरपेक्ष सेवेचे केंद्र व्हावे : सरसंघचालक
4 May 2018►मलकापुरात बाळासाहेब देवरस स्मृती भवनाचे लोकार्पण,
तभा वृत्तसेवा
मलकापूर, ३ मे –
कार्यालयामुळे संघकार्यामध्ये वाढ व्हावी. संघाला अपेक्षित समरस, समर्थ, संघटित समाज निर्माण व्हावा. त्यासाठी संघ कार्यालय हे केवळ स्वयंसेवकांचेच न राहता ते संपूर्ण समाजाचे निरपेक्ष सेवेचे केंद्र व्हावे, असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.
येथील भारतीय नागरिक उत्थान समितीच्या बाळासाहेब देवरस स्मृती भवनाचे लोकार्पण करताना ते बोलत होते. येथील चांडक विद्यालयात हा कार्यक्रम गुरुवारी सकाळी ९ वा. आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी व्यासपीठावर भारतीय नागरिक उत्थान समितीचे अध्यक्ष बाळासाहेब काळे, विभाग संघचालक चित्तरंजन राठी, जिल्हा संघचालक महादेवराव भोजने, तालुका संघचालक विनायकराव पाटील, नगर संघचालक दामोदर लखानी, सचिव अनिल अग्निहोत्री उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, स्वयंसेवकांनी स्वत:चे वैयक्तिक जीवन उन्नत करावे. आपल्या कुटुंबासाठी आवश्यक भौतिक सुविधांसाठी परिश्रम करावेत. त्यासाठी लागणारी बुद्धिमत्ता, कौशल्य प्राप्त करावे, पण त्याचवेळी ज्या समाजामुळे आपण सुखनैव जगतो त्या समाजाचा विसर पडू देऊ नये. समाज सुखी, संपन्न, शक्तिशाली व सुस्थिर असेल तरच आपल्याला आपले वैयक्तिक व कौटुंबिक जीवन आनंदाने जगता येईल. जगाला शक्तीची भाषा समजते. सत्य काय आहे. काय बोलले जाते. यापेक्षा कोण बोलतो हे महत्त्वाचे ठरते. म्हणून शक्तिसंपन्न बलशाली अशा समाजाची उभारणी केली तरच आपल्याला विश्वकल्याणाच्या मार्गावर अग्रेसर होता येईल. तेव्हा, बाळासाहेब देवरस स्मृती भावनाच्या लोकार्पण सोहळ्याला येथे उपस्थित असणार्या प्रत्येकाने स्व-विकसित करण्याचा संकल्प घेऊनच येथून जावे, असे आवाहनही सरसंघचालकांनी केले.
आनंद साजरा करताना काही गोष्टींचे स्मरण ठेवावे लागते. हर्षातिरेक विहित नाही. या वास्तूच्या उभारणीत कोणा कोणाचे योगदान लाभले याची मोठी यादी तयार होईल. मात्र, शेवटची व्यक्ती हिंदू समाजाच्या यादीत समाविष्ट होईपर्यंत त्याचा विस्तार होतच राहणार, असे ते म्हणाले. शुद्ध सात्त्विक आत्मीयता आज लोप पावत आहे. ती टिकून राहावी, यासाठीच हा कार्यक्रम आहे. हेच संघाचे काम असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक व परिचय बाळासाहेब काळे यांनी केले. दामोदर लखानी यांनी मनोगतातून भवन निर्माणाचा इतिहास सांगितला. भवनाची जागा रामचंद्र सोमण यांनी १९९२ साली भारतीय नागरिक उत्थान समितीला दान केल्याचे त्यांनी सांगितले व या कार्यात सहकार्य करणार्यांचे आभार व्यक्त केले.
भूषण शिंदे याने वैयक्तिक गीत सादर केले. संचालन जयंत राजुरकर यांनी केले. याप्रसंगी मलकापूर गीत मंचने देशभक्तिपर व संघगीते सुरेल स्वरात सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

Filed under : रा. स्व. संघ, विदर्भ.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry