बस नदीत कोसळली, २५ ठार
25 Nov 2018बंगळुरू, २४ नोव्हेंबर –
कर्नाटकातील मांड्या येथे भरधाव खाजगी बस कावेरी नदीला जोडलेल्या कालव्यात कोसळली. या भीषण अपघातात २५ प्रवाशांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये लहान मुले आणि महिलांचा समावेश आहे. स्थानिक प्रशासनाने बचावकार्य हाती घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मांड्या जिल्ह्यातून वाहणार्या कावेरी नदीला जोडणार्या कालव्यात आज एक खाजगी बस कोसळली. पांडवपुरा तालुक्याजवळ झालेल्या या भीषण अपघातात २५ प्रवासी ठार झाले. मृतांमध्ये मुले आणि महिलांचा समावेश आहे.
कालव्यातील पाण्यात बस पूर्णतः बुडाल्याने बसमधील मृतदेह काढताना बचाव पथकाला अडचण जात होती. अपघाताची माहिती मिळताच, पोलिस आणि स्थानिक प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी पोहोचले. स्थानिकांच्या मदतीने त्यांनी बचावकार्य हाती घेतले आहे. भरधाव बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त करीत घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री सी. एस. पुट्टुराजू आणि जिल्ह्याचे उपायुक्त यांना घटनास्थळी जाऊन तातडीने बचाव मोहीम सुरू करण्याचे आदेशही दिले.