अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान
20 Nov 2018►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार पलटवार,
नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर –
अटकाने, लटकाने आणि भटकानेवाल्या संस्कृतीने हरयाणा, दिल्ली आणि दिल्ली एनसीआरमधील जनतेचे मोठे नुकसान केले आहे. मात्र, आमचे सरकार ‘सबका साथ सबका विकास’ या मंत्रासोबत देशात विकासाचे काम करीत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले.
कुंडली मानेसर पलवल (केएमपी) एक्सप्रेस वेचे लोकार्पण करताना सुलतानपूर गावात आयोजित कार्यक्रमात मोदी बोलत होते. मोदी यांच्या हस्ते वल्लभगड मेट्रो लाइनचे लोकार्पणही यावेळी करण्यात आले. हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. १३५ किमी लांबीच्या कुंडली मानेसर पलवल (केएमपी) एक्सप्रेस वेचा मानेसर ते पलवल हा पहिला टप्पा दोन वर्षापूर्वीच पूर्ण झाला आहे, आज ८३ किमी लांबीच्या कुंडली ते मानेसर या एक्सप्रेसवेचे लोकार्पण करण्यात आले. वेस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेस-वे म्हणूनही हा मार्ग ओळखला जातो. या एक्सप्रेस-वेमुळे राजधानी दिल्लीत प्रवेश न करता मालवाहतूक करणारी वाहने बाहेरच्याबाहेर निघून जाणार आहेत.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या काळात हा एक्सप्रेस-वे तयार होणार होता. मात्र, काँग्रेसने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची जशी दुर्दशा केली, तशीच दुर्दशा या एक्सप्रेस-वेचीही केली. हा एक्सप्रेस-वे अनावश्यक रखडवण्यात आल्यामुळे १२०० कोटींवरून त्यांचा खर्च तिपटीपेक्षाही जास्त झाला. आधीच्या सरकारच्या काळात जनतेच्या पैशाची नासाडी केली जात होती, असा आरोप मोदी यांनी यावेळी केला.
या एक्सप्रेस-वे मुळे दोन कार्यसंस्कृतीची आपल्याला ओळख होते. पहिली कार्यसंस्कृती आमच्या सरकारची आहे, जी वेगाने कार्य करते. दुसरी कार्यसंस्कृती काँग्रेस सरकारची आहे, जिने या एक्सप्रेस-वेचे काम १२ वर्षे रखडवले, अन्यथा हा एक्स्प्रेसवे आठ-नऊ वर्षे आधीच तयार आला असता, असे मोदी म्हणाले. मोदींनी यावेळी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. कुंडली मानेसर पलवल (केएमपी) एक्सप्रेस-वे योजनेला २१ जानेवारी २००६ ला मान्यता देण्यात आली होती. २९ जुलै २००९ ला या एक्स्प्रेस-वेवरून वाहतूक सुरू होणार होती.
लोक तेच आहेत, काम करणारेही तेच आहेत, मात्र इच्छाशक्ती आणि संकल्पशक्ती असेल, तर कोणतेही लक्ष्य गाठता येते. त्यामुळेच २०१४ मध्ये देशात दररोज १२ किमी राष्ट्रीय महामार्ग तयार होत होते, आज २७ किमी महामार्ग दररोज तयार होतात. या एक्सप्रेस-वेमुळे दिल्ली आणि एनसीआरमधील वाहतुकीवरचा ताण तसेच प्रदूषण कमी होईल, असा विश्वास व्यक्त मोदी म्हणाले की, त्यामुळे हा एक्सप्रेस-वे इकॉनामी, एन्व्हायरान्मेंट फ्रेंडली, इज ऑफ ट्रॅव्हलिंग आणि इज ऑफ लिव्हिंगच्या विचारालाही गती देणारा आहे.
एक्सप्रेस-वे आणि ५०० कोटींच्या खर्चातून तयार झालेल्या वल्लभगड आणि मुजेसर मेट्रो लाइनमुळे या भागात क्रांती होणार आहे, त्याचप्रमाणे श्री विश्वकर्मा कौशल विद्यापीठामुळे तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे, असे ते म्हणाले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा असो की आशियाड हरयाणातील युवक आणि युवतींनी त्याला आपल्या नावाचा डंका वाजवला आहे, असेही ते म्हणाले.