ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर घोटाळ्यातील दलाल मिशेलचे प्रत्यार्पण
5 Dec 2018►भारताकडे रवाना
►मोदी सरकारचे मोठे यश,
नवी दिल्ली, ४ डिसेंबर –
३६०० कोटी रुपयांच्या ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर व्यवहारात भारतातील अधिकार्यांना ४२५ कोटी रुपयांची दलाली देण्याच्या प्रकरणात मध्यस्थाची भूमिका पार पाडणारा ख्रिश्चियन मिशेलला दुबई प्रशासनाने आरोपी प्रत्यार्पण करारानुसार भारताच्या स्वाधीन केले असून, आज रात्री उशिरापर्यंत त्याला भारतात आणले जाणार आहे.
संयुक्त अरब अमिरात आणि भारतात आरोपी प्रत्यार्पण करार असून, मिशेलला दुबई पोलिसांनी अलीकडेच अटक केली होती. तो ब्रिटिशचा नागरिक आहे, अशी माहिती दुबई प्रशासनातील सूत्रांनी दिली.
अंमलबजावणी संचालनालय अर्थात् ईडीने जून २०१६ मध्ये दाखल केलेल्या आरोपपत्रात, मिशेलने ऑगस्टा वेस्टलॅण्ड कंपनीकडून २२५ कोटी रुपये भारतातील अधिकार्यांना दलाली देण्यासाठी प्राप्त केली होती. मिशेल यानेच या व्यवहारात दलाल म्हणून भूमिका पार पाडली होती, असा आरोप केला आहे. ईडी आणि सीबीआय दोघांनीही त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती.
ऑक्टोबरमध्ये दुबईतील कनिष्ठ न्यायालयाने मिशेलला भारताच्या स्वाधीन केले जाऊ शकते, असा निकाल दिला होता. या निकालाला त्याने वरच्या न्यायालयात आव्हान दिले होते, पण दोन्ही देशांमधील आरोपी प्रत्यार्पण करार लक्षात घेता, या न्यायालयानेही गेल्या महिन्यात त्याची याचिका फेटाळून लावली आणि त्याला भारताच्या स्वाधीन करण्याचा मार्ग मोकळा केला होता. प्रत्यार्पणाची सर्व कायदेशीर औपचारिकता या काळात पूर्ण करण्यात आल्यानंतर आज त्याला दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणण्यात आले. रात्री उशिरा त्याचा समावेश असलेले विमान भारताकडे निघाले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
भारतातील अतिमहत्त्वपूर्ण व्यक्तींच्या हवाई सफरींसाठी भारताने ऑगस्टा वेस्टलॅण्ड कंपनीसोबत एडब्ल्यू-१०१ या श्रेणीतील १२ हेलिकॉप्टर्स खरेदीचा करार केला होता, तथापि या व्यवहारात मोठ्या प्रमाणात दलाली देण्यात आल्याची माहिती इटलीतून सर्वप्रथम बाहेर आली आणि भारत सरकारने १ जानेवारी २०१४ रोजी हा करार तातडीने रद्द केला होता. या प्रकरणात सीबीआयने माजी हवाई दलप्रमुख के. सी. त्यागी आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांसह इतर काही अधिकार्यांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे.