कायद्याने राममंदिर मान्य!
21 Nov 2018►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका,
अयोध्या, २० नोव्हेंबर –
अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असले, तरी केंद्र सरकारने यावर संसदेत कायदा तयार केल्यास आमचा मुळीच आक्षेप राहणार नाही, अशी महत्त्वाची भूमिका या प्रकरणातील मुस्लिम पक्षकार इक्बाल अन्सारी यांनी विशद केली. रामलला मंदिरातील पुजारी सत्येंद्र दास यांनी अन्सारी यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे.
राममंदिराच्या निर्मितीसाठी सरकारने लोकसभेत विधेयक आणून, या प्रकरणावर कायमचा तोडगा काढावा. सरकारने कायदा केला, तर आमचा आक्षेप राहणार नाही. भाजपा सरकार चांगले काम करीत आहे आणि आम्ही त्यांचे कौतुक करतो. या सरकारने मुस्लिम समाजाकरिता काही चांगले निर्णय घेतले आहेत, असे त्यांनी सांगितले.
अयोध्येत राजकीय नेते धरणे आंदोलन करण्यासाठी येतात, त्यांनी आपला हेतू सांगावा. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. अयोध्येत गर्दी उसळते. अशा वेळी काही अप्रिय घटना घडली तर कोण जबाबदार राहील, असा सवाल त्यांनी केला.
अन्सारी यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना रामलला मंदिराचे पुजारी सत्येंद्र दास म्हणाले की, अन्सारींची भूमिका स्वागतार्ह आहे. सरकारने तातडीने कायदा करून मंदिराची उभारणी करायला हवी. अन्सारी यांचे वडील हाशिम अन्सारी यांनीही अयोध्या वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता, पण तो यशस्वी झाला नव्हता. मला वाटते त्यांच्या या भूमिकेमुळे सरकारला मार्ग मिळेल.

Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry