निकाह हलालाच्या घटनेने तुमचे हृदय कळवळले का नाही?
9 Feb 2019•अरुण जेटली यांचा राहुल गांधींवर प्रहार,
नवी दिल्ली, ८ फेब्रुवारी –
मुस्लिमांच्या मतांवर डोळा ठेवून, तुम्ही तिहेरी तलाक कायदा रद्द करण्याचे आश्वासन मुस्लिमांना देत आहात. अलीकडेच बरेली येथे निकाह हलालाची हृदयद्रावक घटना समोर आली. या भीषण घटनेने संपूर्ण देशाचे हृदय हेलावले आहे. तुमची अंतरात्मा कसा जागृत झाला नाही, असा जोरदार प्रहार केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी आज शुक्रवारी काँगे्रसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर केला.
बरेलीतील एका मुस्लिम महिलेला तिच्या पतीने दोन वेळा तिहेरी तलाक दिला. पहिल्यांदा तलाक दिल्यानंतर पतीने तिच्याशी पुन्हा विवाह करण्यासाठी निकाह हलालाची प्रथा पूर्ण करण्यासाठी तिला सासर्याकडे पाठविले. त्यानंतर तिच्याशी विवाह करून तिला पुन्हा तिहेरी तलाक दिला. नंतर तिला निकाह हलालाच्या प्रथेसाठी दिराकडे पाठविले. ही आणि यासारख्या अनेक भीषण घटना दररोजच वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित होतात. बरेलीच्या घटनेने तर सामान्याच्या हृदयाचा थरकाप उडविला आहे. तुमच्या मनावर या घटनेचा काहीच परिणाम कसा झाला नाही, असा सवाल जेटली यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर केला आहे.
अशा घटना दररोजच घडतात आणि त्या वाचून सामान्य माणसाचे हृदयही संतापाने पेटून उठते. अशा अघोरी प्रथांवर कायमची बंदी घालायलाच हवी, असे सर्वांनाच वाटते. मग केवळ मुस्लिमांच्या मतांसाठी तुम्ही इतक्या खालच्या स्तरावर कसे जात आहात? तुमचे वडील स्वर्गीय राजीव गांधी यांनीही, मुस्लिम महिलांना किमान पोटगीची हमी देणारा सर्वोच्च न्यायालयाचा शाह बानो प्रकरणावरील निर्णय उलथून लावला होता, असेही जेटली यांनी यात म्हटले आहे.
राजीव गांधी यांच्या भूमिकेमुळे निराधार मुस्लिम महिलांना दारिद्र्य आणि अतिशय वाईट आयुष्य जगण्यास भाग पाडले होते. आज ३२ वर्षांनंतर त्यांचे पुत्र राहुल गांधी यांनी, या मुस्लिम महिलांना केवळ दारिद्र्यातच ढकलले नाही, तर त्यांचे आयुष्यही नरकासमान केले आहे. त्यांच्यासाठी मतांपेक्षा दुसरे काहीच महत्त्वाचे नाही. राजकीय संधीसाधू फक्त दुसर्या दिवसासाठीच ठळक मथळा ठरत असतात, पण राष्ट्र उभारणीसाठी निरंतर काम करणारे आगामी अनेक शतकांपर्यंत देशवासीयांच्या स्मरणात राहतात, असेही त्यांनी नमूद केले.