भारताच्या एनएसजी सदस्यत्व अर्जाला चीनचा विरोध सुरूच
3 Feb 2019•एनपीटीवर सही नसल्याचे कारण,
नवी दिल्ली, २ फेब्रुवारी –
आण्विक पुरवठादार देशांच्या गटात (एनएसजी) भारताचा समावेश होऊ नये, यासाठी चीनच्या हालचाली सुरूच ठेवल्या आहेत. त्यामुळे शेजारी देश असणार्या चीन आणि पाकिस्तानच्या भारतविरोधी भूमिका कायम असल्याचे दिसून येते.
आंतरराष्ट्रीय पातळीवर अतिशय महत्त्व असलेल्या ४८ सदस्यीय एनएसजीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. अमेरिका आणि रशिया यासारखे प्रमुख देश भारताला प्रवेश देण्यासाठी समर्थन देत आहेत. त्यासाठी ते अण्वस्त्र प्रसारसंबंधी भारताची भूमिका अतिशय चांगली असल्याचे सातत्याने नमूद करीत आहेत. चीनने मात्र याउलट भूमिका घेतली आहे. भारताने अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर (एनपीटी) स्वाक्षरी केली नसल्याच्या बाबीवर चीन बोट ठेवत आहे. या करारावर सही न केलेल्या देशांना प्रवेश देण्याची प्रथा नसल्याचा दुराग्रह चीनने कायम ठेवला आहे. भारताने एनएसजी सदस्यत्वासाठी अर्ज केल्यानंतर पाकिस्ताननेही तसेच पाऊल उचलले आहे. अर्थात, इतर प्रमुख देशांचा पाकिस्तानवर विश्वास नाही.
पाकिस्तानची पोटदुखी
दरम्यान, संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत (युएनएससी) संबंधित सुधारणा प्रक्रियेचा आग्रह भारताने धरला आहे. ती प्रक्रिया मार्गी लावण्यासाठी नव्या मार्गांचा अवलंब केला जावा, अशी मागणी नुकतीच भारताने केली. मात्र, युएनएससीमध्ये स्थायी सदस्यत्व मिळवण्याचे प्रयत्न भारताकडून सुरू असल्याने पाकिस्तान अस्वस्थ आहे. त्यातून भारताने केलेल्या मागणीनंतर पाकिस्तानने टीका केली. काही देशांच्या आकांक्षांमुळे ती सुधारणा प्रक्रिया रखडली असल्याचा आरोप करीत पाकिस्तानने भारतावर निशाणा साधला. अर्थात, तो आरोप करताना पाकिस्तानने भारताचा नामोल्लेख टाळला. मात्र, भारताच्या प्रयत्नांमुळे पाकिस्तानला होत असलेली पोटदुखी उघड झाली.