मोबाईलनिर्मिती क्षेत्रात चार लाख रोजगार!
10 Jul 2018►जगातील सॅमसंगच्या सर्वात मोठ्या कारखान्याचे उद्घाटन
►नरेंद्र मोदी व मून जे. इन यांची प्रमुख उपस्थिती,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ९ जुलै –
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे. इन यांनी आज सोमवारी सॅमसंगच्या रूपात जगातील सर्वात मोठ्या मोबाईल कारखान्याचे संयुक्तपणे उद्घाटन केले. या कारखान्यामुळे चार लाख लोकांना मोबाईल क्षेत्रात रोजगार मिळणार आहे.
नोएडा येथे हा प्रकल्प उभारण्यात आला असून, मोदी आणि इन यांनी यांनी यावेळी या प्रकल्पाच्या वैशिष्ट्यांची माहिती दिली. या कारखान्यात किमान चार लाख लोकांना रोजगार मिळेलच, शिवाय मेक इन इंडिया अभियानालाही प्रचंड गती मिळणार आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी येथे येणे माझे फार मोठे भाग्य आहे. सॅमसंगला मी विशेष धन्यवाद देत आहो, कारण कारण, या प्रकल्पातील पाच हजार कोटींची गुंतवणूक सॅमसंगसोबतच भारत आणि दक्षिण कोरियाचे संबंधही बळकट करणार आहे. भारतातील बहुतांश कुटुंबांच्या घरात कोरियन उत्पादन आहेत. भारतात सुमारे ४० कोटी स्मार्टफोनचा वापर केला जातो, असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.
मोबाईलच्या निर्मितीत भारत आता जगात दुसर्या स्थानावर पोहोचला आहे. देशात मोबाईल कारखान्यांची संख्या आधी केवळ दोन होती, ती आता १२० च्या घरात पोहोचली आहे. यातील ५० कारखाने एकट्या नोएडात आहेत.२००५ मध्ये उभारणीस सुरुवात झालेल्या या नव्या प्रकल्पात प्रत्येक महिन्यात किमान १ कोटी २० लाख मोबाईल फोनची निर्मिती केली जाणार आहे. अर्थात् येथे एका सेकंदात चार मोबाईलची निर्मिती होईल आणि त्यातील ३० टक्के मोबाईल फोनची निर्यात केली जाईल, अशी माहिती मोदी यांनी दिली.
भारत आज मॅन्युफॅक्चरिंग हब होण्याच्या दिशेने पुढे जात आहे. दक्षिण कोरियाचे तंत्रज्ञान आणि भारताच्या उत्पादन क्षमतेमुळे जगाला मजबूत उत्पादन मिळेल. सॅमसंगने नोएडामध्ये केलेल्या पाच हजार कोटींच्या गुंतवणुकीमुळे दक्षिण कोरिया आणि भारताचे संबंध आणखी मजबूत होतील, अशी विश्वासही मोदी यांनी व्यक्त केला.
मेट्रोतून केला प्रवास
पंतप्रधान मोदी आणि मून जे. इन यांनी दिल्ली ते नोएडा हा प्रवास मेट्रोने केला. यावेळी त्यांनी मेट्रोतील लोकांशी संवादही साधला. नोएडा येथे पोहोचल्यानंतर दोघांनी गांधी स्मृतिस्थळाला भेट दिली, तसेच मून यांनी महात्मा गांधी यांच्या आवडीचे भजनही ऐकले.
ठळक वैशिष्ट्ये
>सॅमसंगने १९९० मध्ये भारतात आपला पहिला इलेक्ट्रॉनिक प्रकल्प स्थापन केला होता. यात १९९७ पासून टेलिव्हिजनची निर्मिती सुरू करण्यात आली होती.
>मागिल वर्षी जूनमध्ये सॅमसंग कंपनीने ४,९१५ कोटी रुपयांची गुंतवणूक करून नोएडा प्रकल्पाचा विस्तार करण्याची घोषणा केली होती. या युनिटमुळे कंपनीचे उत्पादन दुप्पट होणार आहे.
>सॅमसंग सध्या ६.७० कोटी स्मार्टफोन भारतात निर्माण करते. नवीन प्रकल्प सुरू होताच ही क्षमता वार्षिक १२ कोटी फोन इतकी वाढणार आहे.
>या नव्या कारखान्यात केवळ मोबाईल फोनच नाही, तर सॅमसंगचे फ्रीज, प्लॅटपॅनेलयुक्त टीव्ही यासारख्या ग्राहकपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे उत्पादनही दुप्पट वाढणार आहेत.