रणगाडाभेदी ‘हेलिना’ची यशस्वी चाचणी
9 Feb 2019•हेलिकॉप्टर्समधून करता येणार मारा,
बालासोर, ८ फेब्रुवारी –
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात् डीआरडीओने आज शुक्रवारी हेलिकॉप्टर्समधून मारा करता येणार्या रणगाडाभेदी ‘हेलिना’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली.
रणगाडाभेदी नाग क्षेत्रणास्त्राची ‘हेलिना’ ही सुधारित आवृत्ती असून, किमान आठ किलोमीटर अंतरावरील लक्ष्य अचूक भेदण्याची या क्षेपणास्त्र प्रणालीची क्षमता आहे. ओडिशाच्या किनारपट्टीवरील बालासोर जिल्ह्यातील चांदीपूरच्या एकात्मिक चाचणी केंद्रात लष्करी हेलिकॉप्टरमधून या क्षेपणास्त्राची आज दुपारी १२ वाजून ५५ मिनिटांनी चाचणी घेण्यात आली, अशी माहिती डीआरडीओच्या प्रवक्त्याने दिली.
चाचणीच्या काळात हेलिना क्षेपणास्त्र हेलिकॉप्टरमधील आपल्या लॉन्च पॅडमधून अलगद बाहेर पडले आणि आठ किलोमीटर अंतरावर ठेवण्यात आलेल्या आपल्या लक्ष्याचा अचूक वेध घेतला.
डीआरडीओने हे क्षेत्रणास्त्र विकसित केले असून, जगातील सर्वोत्तम रणगाडाभेदी क्षेपणास्त्रांपैकी ते एक असल्याचे प्रवक्ता म्हणाला. या क्षेपणास्त्रामुळे भारताची संरक्षण क्षमता कितीतरी पटीने वाढणार असल्याचे प्रवक्त्याने सांगितले.
चाचणीतील सर्व निकष या क्षेपणास्त्राने पूर्ण केले आहे. यापूर्वी १३ जुलै २०१५ रोजी राजस्थानच्या जैसलमेल येथील चाचणी केंद्रातून हेलिनाच्या सलग तीन चाचण्या घेण्यात आल्या होत्या. तसेच, गेल्या वर्षी १९ ऑगस्ट रोजी या क्षेपणास्त्राची लष्कराच्या रूद्र हेलिकॉप्टरमधूनही यशस्वी चाचणी घेण्यात आली होती.

Filed under : राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry