वढेरांची ईडीकडून चौकशी
7 Feb 2019•विदेशातील संपत्ती प्रकरण
•मनोज अरोराला ओळखतो, भंडारी, चढ्ढाशी संबंध नाही,
नवी दिल्ली, ६ फेब्रुवारी –
संरक्षण खरेदी आणि अन्य व्यवहारांमधून अमाप काळा पैसा कमावून विदेशात कोट्यवधी रुपयांची संपत्ती खरेदी करण्याच्या आरोपात अंमलबजावणी संचालनालय अर्थात् ईडीने आज बुधवारी काँगे्रसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरांची पाच तासपर्यंत कसून चौकशी केली. अनेक प्रश्नांना वढेरांनी नाही, माहीत नाही, ओळखत नाही, अशी थातूरमातूर उत्तरे दिली.
बेकायदेशीर सावकारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत ईडीने रॉबर्ट वढेराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी त्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आला होता. त्यानुसार आज दुपारी ३ वाजून ४७ मिनिटांनी ते जामनगर हाऊस येथील ईडीच्या मुख्यालयात हजर झाले. यावेळी मुख्यालयाबाहेरपर्यंत त्यांच्या पत्नी प्रियांका वढेराही आल्या होत्या. रॉबर्ट मुख्यालयात गेल्यानंतर प्रियांका परत फिरल्या होत्या. संशयास्पद आर्थिक व्यवहारांच्या आरोपात रॉबर्ट वढेरा आज प्रथमच ईडीपुढे चौकशीसाठी हजर झाले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे काही वकीलही होते. चौकशीच्या कक्षात नेण्यापूर्वी त्यांनी हजेरी बुकावर स्वाक्षरी केली.
माझी विदेशात कुठलीही संपत्ती नाही, केवळ राजकीय सुडापोटी मला त्रास दिला जात आहे. मनोज अरोराला ओळखता काय, असे अधिकार्यांनी विचारले असता; होय, तो माझा कर्मचारी होता, असे उत्तर वढेरा यांनी दिले. अरोराचा ई-मेल काय आहे, या प्रश्नाचे उत्तर देण्यास त्यांनी नकार दिला.
शस्त्रांचा व्यापारी संजय भंडारी आणि त्याचा चुलत भाऊ सुमित चढ्ढाविषयी विचारणा केली असता, या दोघांनाही मी ओळखत नाही आणि त्यांच्याशी माझा कधी संबंधही आला नाही, असे ते म्हणाले.
एकूण तीन टप्प्यांमध्ये त्यांची चौकशी पार पडली. पहिल्या टप्प्यात त्यांना मनोज अरोरा, सुमित चढ्ढा, सी. थम्पी आणि संजय अरोरा यांच्यासोबत असलेल्या संबंधांवर प्रश्न विचारण्यात आले. अरोराचे ई-मेल आणि त्याने बेकायदेशीर सावकारी प्रकरणी दिलेल्या कबुलीजबाबावर तुमचे काय मत आहे, असे विचारले असता त्यांनी, ‘मला माहीत नाही’ असे उत्तर दिले.
चौकशीच्या दुसर्या टप्प्यात, विदेशात तुमच्या मालकीच्या ९ संपत्ती, तीन बंगले आणि सहा फ्लॅट्स आहेत आणि हे सर्व व्यवहार एकसारख्याच पद्धतीने झाले, असे विचारले असता, यावर तुम्हाला का सांगायचे आहे. विदेशात माझी एकही संपत्ती नाही, असे त्यांनी सांगितले.
तिसर्या टप्प्यात त्यांना संरक्षण आणि पेट्रोलियम खरेदी व्यवहारात दलालांकडून झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या फायद्याविषयी विचारणा करण्यात आली. यावरही त्यांनी मला माहीत नाही, माझा काहीच संबंध नाही, असे उत्तर दिले असल्याची माहिती सूत्राने दिली.
ईडीचे वढेरांवरील आरोप
दरम्यान, लंडनमधील १२, ब्रायनस्टन स्क्वेअर येथे रॉबर्ट वढेरा यांनी १७ कोटी रुपये मोजून फ्लॅट विकत घेतला आणि या व्यवहारात अनेक व्यवहारांमध्ये मिळालेल्या दलालीच्या पैशाचा वापर झाल्याचा, तसेच हा फ्लॅट वढेरा यांच्या मालकीचा असल्याचा दावा ईडीने केला आहे. वढेरा आणि त्यांच्या सहकार्यांना २००९ मध्ये झालेल्या पेट्रोलियम व्यवहारातही अमाप पैसा मिळाल्याचा दावा ईडीने न्यायालयात केलेला आहे.
पुन्हा समन्स बजावणार
रॉबर्ट वढेरांनी एकाही प्रश्नाला समाधानकारक उत्तर दिले नाही. बहुतांश प्रश्न त्यांनी टाळण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे आम्ही त्यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी समन्स बजावणार आहोत, अशी माहिती ईडीच्या सूत्राने दिली.

Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry