वॉलमार्ट-फ्लिपकार्ट विकणार परस्परांची उत्पादने
26 Sep 2018मुंबई, २५ सप्टेंबर –
किराणा क्षेत्रातील व्यवसाय वाढवण्यासाठी वॉलमार्ट-फ्लिपकार्ट परस्परांचे खासगी ब्रॅण्ड विकणार असल्याची माहिती वॉलमार्टने दिली. दोन्ही कंपन्या एकमेकांकडील तंत्रज्ञ आणि विश्लेषकांचा वापरही व्यवसाय वृद्धीसाठी करणार असल्याची माहिती देण्यात आली.
सध्या आम्ही आमचे ब्रॅण्ड आमच्याच स्टोअरमध्ये विकत आहोत. स्टोअरव्यतिरिक्त इतर ठिकाणी हे ब्रॅण्ड न विकण्याचे कोणतेही कारण दिसत नाही. आमच्यासमोर फ्लिपकार्टचा पर्याय आहे, असे वॉलमार्ट इंडियाचे मुख्य कार्यकारी क्रिश अय्यर यांनी सांगितले. फ्लिपकार्टवर सर्वच विक्रेते आहेत आणि जर तुम्ही किराणा क्षेत्राबाबत बोलाल, तर या क्षेत्रात योग्य विक्रेता मिळाल्यास आम्ही या क्षेत्रात परिपूर्ण होऊ, असे त्यांनी सांगितले. ते तंत्रज्ञानात, विश्लेषणात आणि ग्राहक संबंधांमध्ये परिपूर्ण आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
फ्लिपकार्टसाठीदेखील ही एक संधी आहे. देशभरातील एकूण विक्रीमध्ये त्यांचा ६ ते ७ टक्के हिस्सा आहे. याउलट अमेरिकेतील एकूण महसुलापैकी एक तृतीयांश महसूल बेंटव्हिले येथील त्यांच्या पालक कंपनीला प्राप्त होतो.
किरकोळ क्षेत्रात ५५ टक्के थेट विदेशी गुंतवणुकीस भारतात मान्यता देण्यात आली. दुसरीकडे जे किरकोळ स्टोअरसारख्या व्यावसायिक संस्थांना किरकोळ आणि इतर उत्पादने विकतात, अशा ‘कॅश अॅण्ड कॅरी’ उपक्रमांमध्ये १०० टक्के थेट विदेशी गुंतवणुकीस भारतात मान्यता देण्यात आली आहे.
वॉलमार्ट तांत्रिकदृष्ट्या स्वतःचे ब्रॅण्ड्स थेट ग्राहकांना विकू शकत नाही. त्याची विक्री आता फ्लिपकार्टच्या माध्यमातून करणे शक्य होईल. असे असले तरी वॉलमार्टच्या काही खासगी वस्तू घाऊक प्रमाणात किराणा दुकानांमध्ये विकल्या जातात.
यामध्ये या कंपनीच्या वस्तू विकणारे पुनर्विक्रेते गुंतले असल्याने यात कोणताही कायद्याचा पेच नाही. जर तांत्रिक अडचण निर्माण झालीच, तर फ्लिपकार्टला या ग्राहकोपयोगी वस्तूंची विक्री करण्यासाठी वॉलमार्टला आणखी एक कंपनी निर्माण करणे शक्य आहे, असे एक सल्लागार कंपनी थर्ड आयसाईटचे मुख्य कार्यकारी अधिकारी देवांग्शू दत्ता यांनी सांगितले.
दोन्ही कंपन्यांच्या चमू वेगवेगळ्या आहेत आणि या दोन्ही कंपन्यांना लगेचच फायदे दिसणार नाहीत, असे वॉलमार्टने स्पष्ट केले आहे. दोन ते तीन महिन्यांत दोन्ही कंपन्या परस्परांच्या वस्तू विकू शकणार नाहीत. लघुकालीन आणि मध्यमकालीन फायद्यासाठी योग्य नियोजन करून त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे, असे वॉलममार्टच्या क्रिश अय्यर यांनी पंजाब येथील लुधियानातल्या २२ व्या स्टोअरचे उद्घाटन करताना सांगितले.