सरन्यायाधीशांवर दबाव आणण्यासाठीच होती पत्रपरिषद : न्या. जोसेफ
5 Dec 2018नवी दिल्ली, ४ डिसेंबर –
गेल्या १२ जानेवारीला भारताच्या इतिहासात प्रथमच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी पत्रपरिषद घेतली होती. या घटनेने देशात खळबळ उडाली होती. न्या. कुरियन जोसेफ, न्या. रंजन गोगोई, न्या. जे चेलमेश्वर आणि न्या. मदन लोकूर यांनी ही पत्रकार परिषद घेत सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले होते. या पृष्ठभूमीवर चौघांपैकी एक न्या. कुरियन जोसेफ यांनी पत्रकार परिषदेच्या आयोजनासंबंधी एक मोठे स्पष्टीकरण दिले आहे. तत्कालीन सरन्यायाधीशांवर दबाव आणण्यासाठी आम्ही ही पत्रपरिषद घेतली होती, असे न्या. जोसेफ यांनी म्हटले आहे. चारही न्यायमूर्तींना तत्कालीन सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यावर बाहेरील लोकांकडून काहीतरी दबाव होता अशी शंका होती. आम्ही सरन्याधीशांना पत्र लिहून न्यायपालिकेचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याबाबत आग्रह केला होता. मात्र, स्थिती बदलली नाही, त्यामुळेच आम्ही पत्रपरिषद घेतली, असे न्या. जोसेफ यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.
न्या. जोसेफ म्हणाले की, महत्त्वाच्या केसेस अशा न्यायाधीशांकडे दिल्या जात होत्या, ज्यांच्या राजकीय संबंधाच्या चर्चा सर्वत्र होत्या. आम्हाला ही गोष्ट योग्य वाटली नाही. न्यायपालिकेची विश्वासार्हता जपण्यासाठी आम्हाला समोर येणे गरजेचे होते.
न्या. लोया यांच्या मृत्युप्रकरणी विचारले असता ते म्हणाले की, ही केवळ एकच घटना नव्हती. अशा अनेक घटनांमध्ये बाहेरील हस्तक्षेप होत होता. ज्या दिवशी आम्ही पत्रपरिषद घेतली, त्या दिवशी लोयांच्या केसची एका विशेष खंडपीठापुढे सुनावणी होती. बाहेरील हस्तक्षेप हा राजकीय होता की अन्य काही, यावर मी बोलू शकत नाही. मात्र, सरन्यायाधीशांचे अनेक प्रशासकीय निर्णय त्यांच्या स्वातंत्र्यावर कुणाचा तरी दबाव आणून घेतल्यासारखे वाटत होते. सर्वोच्च न्यायालयाचा गेल्या दोन महिन्यांतील कारभार व्यथित करणारा आहे. काही महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालय प्रशासन नीट काम करीत नाही. याबाबत सरन्यायाधीशांसमोर प्रश्न मांडले, पण काहीच उपयोग झाला नाही, अशी हतबलता दुसर्या-तिसर्या कोणी नाही तर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी मांडली होती. विशेष म्हणजे ज्या चार न्यायमूर्तींनी पत्रपरिषद घेतली ते सरन्यायाधीशांनंतरचे सर्वात वरिष्ठ आहेत. न्या. जे चेलमेश्वर यांच्या घरासमोर ही पत्रपरिषद घेण्यात आली होती.

Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry