सिद्धूंना भारत हवा की पाकिस्तान?
30 Nov 2018►खलिस्तानवाद्यांच्या फोटोवरून अकाली दलाचा हल्ला,
चंदीगड, २९ नोव्हेंबर –
भारतीय जवानांना ठार मारण्याचे आदेश देणारा पाकचा लष्करप्रमुख कमर जावेद बाजवाची गळाभेट घेतल्यानंतर काँगे्रसचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी आता भारताचा शत्रू असलेल्या खलिस्तानी अतिरेक्यासोबत छायाचित्र काढले. सिद्धूसाठी भारत महत्त्वाचा आहे की पाकिस्तान, हे त्यांनी आता स्पष्ट करावे, अशा शब्दात अकाली दल नेत्यांनी हल्ला चढविला.
पाकिस्तान शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीचा सरचिटणीस आणि खलिस्तानवादी अतिरेकी गोपालसिंग चावलासोबत सिद्धूने कतरातपूर कॉरिडोरच्या उद्घाटनप्रसंगी छायाचित्र काढले होते. ते सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सिद्धूवर टीकेची झोड उठली. याच कार्यक्रमात चावला आणि पाकचे लष्करप्रमुख बाजवा एकमेकांशी हस्तांदोलन करीत असल्याचे छायाचित्रही व्हायरल झाले होते.
अलीकडेच अमृतसरच्या निरंकारी भवनावर बॉम्बहल्ला करणारे अतिरेकी आणि चावला यांच्यात संबंध असल्याचा तपास यंत्रणांचा आरोप आहे. अशा चावलाशी हस्तांदोलन करून, सिद्धू त्याच्यासोबत छायाचित्र काढतात. त्यामुळे सिद्धूचे भारतावर खरंच प्रेम आहे काय, त्यांच्यासाठी भारताचे काही महत्त्व आहे काय, हे आता त्यांनी स्वत:च सांगायला हवे, असे शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांनी सांगितले.
पंजाबमधील नागरिकांना मादक द्रव्याच्या व्यवसात बुडविण्यात पाकिस्तानचाच हात आहे आणि पाकमधूनच पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात मादक द्रव्याची तस्करी केली जाते, ही सत्यता सिद्धूंना चांगली ठाऊक आहे.
पाकमध्ये काँगे्रसच्या विस्ताराला वाव
बादल यांनी यावेळी काँगे्रसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही हल्ला चढविला. त्यांचा नेता सिद्धू आता पाकमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला असल्याने, काँगे्रस पक्षाचा पाकमध्ये विस्तार करण्याची चांगली संधी राहुल गांधी यांना प्राप्त झाली आहे.
पाकिस्तानच्या काँगे्रसच्या अध्यक्षपदी सिद्धू यांची नियुक्ती झाल्यास काँगे्रस तिथे सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयास येईल, असा टोलाही त्यांनी हाणला.