सीबीआयला कायदेशीर चौकटच नाही
5 Nov 2018►माजी न्यायमूर्ती चेलमेश्वर यांचे मत,
नवी दिल्ली, ४ नोव्हेंबर –
देशात सीबीआय ही एक महत्त्वाची तपास यंत्रणा समजण्यात येत असली तरी यंत्रणेला कोणतीही कायदेशीर चौकट नाही, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती जस्ती चेलमेश्वर यांनी व्यक्त केले आहे. काँग्रेस पक्षाशी संबंधित ऑल इंडिया प्रोफे शनल काँग्रेस या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
ते म्हणाले की, दिल्ली स्पेशल पोलिस एस्टॅब्लिशमेंट अॅक्टनुसार सीबीआय ही संस्था स्थापन करण्यात आली आहे. मात्र, ती घटनात्मक नाही किंवा तिला वैधानिकही स्वरूपही नाही. गेल्या अनेक वर्षांपासून या संस्थेचा कारभार सुरू आहे. लोकांचा छळ करण्याचे अनेक अधिकार सीबीआयकडे आहेत, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.
आजकाल कोणत्याही राज्यात राजकीयदृष्ट्या कोणतेही एखादे संवेदनशील प्रकरण घडले की लोक थेट सीबीआय चौकशीची मागणी करतात. मात्र, त्या संस्थेत माणसेच काम करतात आणि त्यांच्याकडूनही चूक होऊ शकते ही बाबही आपण ध्यानात घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयातील कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करण्यासाठी तेथील चार वरिष्ठ न्यायाधीशांनी एकत्रितपणे थेट जाहीर पत्रकार परिषद घेण्यात चेलमेश्वर यांचाही समावेश होता. त्या संदर्भात ते म्हणाले की, त्यावेळी पत्रकार परिषद घेण्याखेरीज दुसरा मार्गच उरला नव्हता. सर्वोच्च न्यायालयात एकामागून एक विपरीत घटना घडल्यानंतर तत्कालीन सरन्यायाधीशांना पत्र पाठवून त्याविषयी नाराजीही व्यक्त करण्यात आली होती.
त्याचा काही परिणाम झाला नसल्याचे लक्षात आल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडण्याचा निर्णय आम्ही घेतला.
आमच्या या कृतीवर अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आमचे प्रश्न अंतर्गत पातळीवरच समर्थपणे सोडवले गेले असते तर तशी वेळच आली नसती, असेही त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसही जबाबदार
सीबीआयच्या सध्याच्या स्थितीबाबत माजी न्यायमूर्ती चेलमेश्वर यांनी राजकारणाला जबाबदार धरले. ते म्हणाले की, सीबीआयच्या या स्थितीला काँग्रेस पक्षासह देशातील सर्व राजकीय पक्ष जबाबदार आहेत. कारण प्रत्येकाने तिला आपापल्या सोयींनी वापरले आहे. अतिशय महत्त्वाच्या अशा या यंत्रणेला योग्य स्थान आणि घटनात्मक दर्जा मिळवून देण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी प्रयत्न करायला हवेत, असेही ते परखडपणे म्हणाले.

Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry