हिमतीसाठी मला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही
6 Feb 2019•नितीन गडकरी यांचा राहुल गांधींना टोला,
नवी दिल्ली, ५ फेब्रुवारी –
माझ्यात किती हिंमत आहे आणि मी किती प्रामाणिक आहे, यासाठी मला तुमच्या प्रमाणपत्राची मुळीच गरज नाही, अशा सडेतोड शब्दात केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांनी आज मंगळवारी काँगे्रसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना टोला हाणला.
नितीन गडकरी भाजपाचे असे एकमेव नेते आहेत, ज्यांनी खर बोलण्याची हिंमत दाखवली, आता त्यांनी राफेलवरही सत्य सांगावे, असे ट्विट राहुल गांधींनी केले होते. त्यांच्या या ट्विटला गडकरी यांनी ट्विटरच्या माध्यमातूनच उत्तर दिले. गडकरी यांनी एकूण चार ट्विट करीत, राहुल गांधींच्या विविध मुद्यांचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, राहुल गांधीजी, माझ्या हिंमतीसाठी मला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही; पण एका पक्षाचा अध्यक्ष असतानाही आमच्या सरकारवर हल्ला करण्यासाठी तुम्हाला प्रसारमाध्यमांनी अतिरंजित केलेल्या वृत्तांचा आधार घ्यावा लागतो, याचे मला आश्चर्य वाटते.
तुम्हाला हल्ला करण्यासाठी दुसर्यांचे खांदे शोधावे लागतात, यातच मोदीजी आणि आमच्या सरकारचे यश आहे. राहिला मुद्दा तुम्ही उचललेल्या मुद्यांचा, तर मी छातीठोकपणे सांगू शकतो की, राफेलमध्ये आमच्या सरकारने देशाचे हित समोर ठेवूनच आजवरचा सर्वाधिक पारदर्शक व्यवहार केला आहे, असे गडकरी यांनी स्पष्ट केले. अन्य एका ट्विटमध्ये गडकरी यांनी, शेतकर्यांना भेडसावणार्या समस्यांवरही आपले मत मांडले. त्यांनी म्हटले आहे की, तुमच्या धोरणांमुळे शेतकर्यांना आजवरच्या सर्वांत वाईट परिस्थितीत ढकलले, तिथून त्यांना बाहेर काढण्यासाठी मोदी सरकार प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत आणि आम्हाला यात यशही मिळत आहे. तुमच्यासह काही जणांना मोदी पंतप्रधान झालेले सहन होत नाही. त्यामुळे तुम्हाला असहिष्णुता आणि घटनात्मक संस्थांवर हल्ला होत असल्याचे स्वप्न सतत पडत असते.
घटनात्मक संस्थांवरील हल्ल्याबाबत गडकरी म्हणाले की, आमच्या आणि काँग्रेसच्या डीएनएमध्ये हाच फरक आहे. आम्ही लोकशाही आणि घटनात्मक संस्थांवर विश्वास ठेवतो म्हणून तुमची ही खेळी काम करीत नाही. मोदीजी पुन्हा पंतप्रधान बनतील आणि आम्ही मजबुतीने देशाला विकासाच्या शिखरावर पोहोचवू. तुम्ही भविष्यात समजूतदारपणे आणि जबाबदारीने वागाल, अशी आशा असल्याचेही गडकरी यांनी राहुल गांधी यांना उद्देशून म्हटले आहे.