वढेरांच्या चौकशीमागील वास्तव…
8 Feb 2019यशोगाथा ऐकायला कुणाला आवडत नाही? एखाद्या व्यक्तीने शून्यातून केलेली निर्मिती, एखाद्या चहावाल्याने वर्षानुवर्षांच्या कष्टातून मिळवेलेले यश, एखाद्या क्रीडापटूने विपरीत परिस्थितीवर मात करून मिळविलेली मेडल्स, एखाद्या विद्यार्थ्याने अपंगत्वावर वा गरिबीवर विजय मिळवून यशाला घातलेली गवसणी किंवा एखाद्या शेतकर्याने काळ्या मातीतून पिकविलेल्या सोन्याच्या कथा सदासर्वदा ऐकल्या जातात, त्यावर लिहिले जाते आणि वाचलेही जाते. यश योग्य मार्गाचा वापर करून नैतिकतेच्या मार्गाने चालत जात, प्रामाणिकतेची वाट चोखाळत आणि नीतिमूल्यांची कास धरत गाठले जावे, अशी सर्वसामान्य अपेक्षा असते. आणि अशाच यशोगाथांची नोंद इतिहासातही घेतली जाते. असे यश जागतिक कीर्तीचे असेल, तर त्याची इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होते. गांधी घराण्याच्या जावयानेही यश मिळविले. अगदी काही लाखांची संपत्ती अल्पावधीत कोट्यवधींची बनविली. कालपर्यंत रोडपती असलेला हा जावई काही वर्षांत करोडपतींच्या पंक्तीत जाऊन बसला. भलेभले आश्चर्यात पडले. उद्योगपतींनाही त्याने असे कोणते कर्तृृत्व केले, याची भुरळ पडली. पण, जंग जंग पछाडून रॉबर्ट वढेरा यांचे उद्योग कुणाला कळले नाही. पण, त्यांनी काही वर्षांत मारलेली कोट्यवधींची छलांग चौकशी संस्थांना खटकली आणि त्यांच्या मागावर राहण्याचा त्यांनी चंगच बांधला. अंमलबजावणी संचालनालयाकडून त्यांची कसून झालेली चौकशी ही त्याच कारणातून झाली असून, याद्वारे त्यांनी जमविलेल्या मायेचा स्रोत शोधून काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चौकशीतून जे काय निष्पन्न व्हायचे ते होईल, पण जनतेने मात्र एका मुद्यावर शिक्कामोर्तब करून टाकलेले आहे. जी व्यक्ती कुठलाही सनदशीर व्यवहार न करता श्रीमंत होत असेल तिथे भ्रष्टाचाराचे पाणी निश्चितच मुरत आहे. म्हणूनच सरकारी पैशांची लूट करून रॉबर्ट वढेरा करोडपती झाल्याचे बोलले जात आहे, त्यात तथ्य असल्याची लोकांची प्राथमिक भावना झालेली आहे. वढेरांनी परदेशात निव्वळ संपत्तीच खरेदी केली नाही, तर दुबई, सिंगापूर आणि स्वित्झर्लंडसारख्या देशांतून राऊंड ट्रिपिंगच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा करून घेतला. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात सोनिया आणि राहुल गांधींना जामीन मिळालेला आहे आणि आता त्यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांचीदेखील चौकशी सुरू झाल्याने त्यांच्यावरदेखील अशाच प्रकारची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. बेकायदेशीर सावकारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत रॉबर्ट वढेरा यांची चौकशी सुरू आहे. कुठलाच भ्रष्टाचारी आपली चूक मान्य करीत नसतो, त्याचप्रमाणे वढेरांनीदेखील विदेशात आपली कुठली संपत्ती असल्याचे अमान्य केले आहे. केवळ सूडापोटी माझ्यामागे चौकशीचा ससेमिरा लावल्याचे त्यांचे म्हणणे आहे. शस्त्रास्त्रांंचा दलाल संजय भंडारी आणि त्याचा चुलत भाऊ सुमित चढ्ढा यांच्याशी ओळख त्यांनी नाकारली आहे. पण, यात कितपत तथ्य आहे? कारण घोटाळे ही काँग्रेसची संस्कृतीच होऊन बसली आहे. डॉ. मनमोहनसिंग यांच्या कार्यकाळापासून तर काँग्रेसच्या मंडळींनी केलेल्या घोटाळ्यांची यादी मारुतीच्या शेपटाप्रमाणे लांबत जाणारी आहे. टू जी घोटाळा, कोळसा घोटाळा, चारा घोटाळा, टेलिकॉम घोटाळा, जमीन घोटाळा, आदर्श घोटाळा, धान्य आयात घोटाळा, एअरसेल मॅक्सिस घोटाळा, सिंचन घोटाळा, अगस्ता वेस्टलॅण्ड घोटाळा, सिमेन्टेक घोटाळा… अशी ही यादी बोटावर मोजता न येणारी आहे. घोटाळे करायचे, त्याची चौकशी सुरू झाली की, सरकार सूडबुद्धीने काम करीत असल्याची बोंब ठोकायची, हेच सर्व भ्रष्टाचारी नेत्यांनी ठरवून टाकले आहे. काँग्रेसने तर राज्य आणि केंद्रातील विभाग एकेका व्यक्तीला वाटून दिले होते. त्यामुळे प्रत्येक नेता आपली जागीर समजून या कुरणात चरत होता. वर्षानुवर्षे देशाच्या खनिज संपत्तीची लूटपाट सुरू होती. देशातील शेतकर्यांच्या स्थितीकडे लक्ष देण्याची काँग्रेस नेत्यांची तयारी नव्हती. शेतकर्याच्या पिकाला भाव मिळायला लागले की, आयात करून भाव पाडायचे आणि विक्रमी पीक आले, तर निर्यातीवर बंधने आणायची, अशी रीत अबलंबली जायची. आज सर्वत्र नोटबंदीमुळे काळा पैसा असलेल्यांचे पाश आवळले गेले आहेत. कुठलीही बेकायदेशीर कामे करण्यासाठी हाती रोख पैसा नसल्याने काँग्रेसी नेत्यांची पंचाईत झाली आहे. अगदी काश्मीर राज्यातील दगडफेकीच्या घटना, सीमेपलीकडून होणारी घुसखोरी, देशाच्या विभिन्न भागात होणार्या दंगली, विनाकारण उभारण्यात येणारी निरनिराळी आंदोलने, सरकारविरोधी जनमत तयार करण्यासाठीचे मेळावे या सार्यांवर नोटाबंदीमुळे बंधने आली आहेत. त्यामुळे देशातील यच्चयावत सार्या विरोधकांनी सत्तारूढ भाजपाविरुद्ध महाआघाडी तयार करण्याचा डाव आखला आहे. पण, ही रणनीती सकारात्मकतेवर आधारित नव्हे, तर भ्रष्टाचारात अडकलेले आपले हात मोकळे व्हावे, असे सरकार केंद्रात सत्तारूढ व्हावे म्हणून आखली गेलेली आहे. पण, ही रणनीती कितपत यशस्वी होते, हे काळच ठरवणार आहे.
कोणतीही पत्नी पडत्या काळात आपल्या पतीसोबत उभी राहिलेली दिसते. त्या नियमानुसार रॉबर्ट वढेरा यांना चौकशीसाठी बोलावले गेले तेव्हा पत्नी प्रियांका हिने त्यांची साथ केली. रॉबर्ट वढेरांना तिने अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयापर्यंत आणून सोडले आणि ती पुढच्या कामासाठी रवाना झाली. यातून सरकारी यंत्रणांवर दबाव निर्माण करण्याचाही प्रयत्न काँग्रेसकडून होत आहे. माझा नवरा एकटा नाही, त्याच्यामागे पक्षाची पूर्ण ताकद उभी आहे, हेच महासचिव प्रियांकांना दाखवून द्यायचे होते. जीएसटी आणण्याचा निर्णय काँग्रेसच्याच कार्यकाळात झाला होता. पण, त्यावर एकमत न झाल्याने तो बारगळला. तोच जीएसटी भाजपाने सर्व ताकद पणाला लावून पारित करवून घेतल्यावर आता त्याबाबत काँग्रेससह इतर अनेक विरोधी पक्ष आक्षेप नोंदवीत आहेत. अशा रीतीने पुढे चाललेल्या गाडीला ब्रेक लावण्याचा प्रकार काँग्रेसतर्फे केला जात आहे. लोकसभेच्या निवडणुका जवळ येताच खोट्या आश्वासनांचाही पाऊस पाडला जाऊ लागला आहे. लोकांची मते मिळविण्यासाठी समाजाची पावले खोलात जात नाहीत ना, याकडे पाहण्याची तसदीदेखील घेण्याची काँग्रेसची तयारी नाही. काँग्रेसने घोषित करून टाकले की, आमचे सरकार सत्तेवर आले तर आम्ही तिहेरी तलाकचा कायदा समाप्त करून टाकू. या कायद्यामुळे भाजपाच्या हाती मुस्लिम पुरुषांना पोलिस ठाण्यात हजर करणे आणि त्यांना तुरुंगात टाकण्याचे एक मोठे शस्त्र लागले असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. या कायद्यामुळे महिलांचे सशक्तीकरण शक्यच नाही, अशीही काँग्रेसची भूमिका आहे. एकंदरीत, भाजपाने घेतलेल्या निर्णयांना विरोध करण्याचा निर्धार काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी केला आहे. शारदा चिटफंड घोटाळ्यात ममतांवर आजवर दोषारोपण करणारे राहुल गांधी आता ममतांच्या मदतीसाठी तयार झाले आहेत. त्याचप्रमाणे विभिन्न राज्यांतील विरोधकांची आघाडी आकार घेऊ लागली आहे. पण, या सार्यामागे मोदींचे असलेले भयच कारणीभूत आहे. म्हणूनच रॉबर्ट वढेरा यांनीही कुठलेही भय न बाळगता चौकशीला सामोरे जाऊन त्यातून तावूनसुलाखून बाहेर पडावे…