सूडबुद्धीचे राजकारण
9 Dec 2018भाऊ तोरसेकर |
नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले आणि भाजपाला एकहाती बहुमत मिळाले, त्याला आता साडेचार वर्षाचा कालावधी होऊन गेला आहे. आणखी सहा महिन्यात नव्या निवडणुका होतील आणि नवी लोकसभा निवडली जाईल. त्याचे निकाल कसे लागतील माहीत नाही. पण सध्या तरी तमाम विरोधक म्हणवल्या जाणार्या पक्ष आणि व्यक्ती, संस्थांचे धाबे, मोदी पुन्हा जिंकतील म्हणून दणाणले आहे. कारण या पहिल्या साडेचार वर्षात मोदी सरकारने ज्या तळापासून हालचाली केल्या आहेत, त्याच्या पायावर पुढल्या काळात सार्वजनिक जीवनात यापैकी अनेक पुरोगाम्यांना व काँग्रेसी नेत्यांना सुखनैव आपल्या घरात लपून बसणेही शक्य होणार नाही. किंगफिशरच्या विजय माल्याप्रमाणे दूर देशी पळूनही जाणे मोदींनी शक्य ठेवलेले नाही. कारण तशा पळालेल्यांना उचलून मायदेशी आणण्याची प्रक्रियाही मोदींनी सोपी करून टाकलेली आहे. सहाजिकच पुरोगामित्व किंवा नेहरूवाद म्हणून मागील सहा-सात दशकात दिवसाउजेडी देशाची जी लूट झाली, ती थांबलेली आहे आणि वसुलीला आरंभ झाला आहे. त्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. सोनिया वा अन्य काँग्रेसवाल्यांच्या खिशात पैसे घालणार्या संरक्षण खरेदीचे जुने व्यवहार चव्हाट्यावर यायला लागले आहेत. राफ़ायलचा जप करणार्या राहुल गांधींची वाचा बसली आहे. नरेंद्र मोदींनी राफ़ायलचा करार करताना जनतेचे तीस हजार कोटी अनिल अंबानीच्या खिशात टाकल्याची टकळी राहुलनी चार महिन्यापासून लावलेली होती. तिचा एकही पुरावा त्यांना सादर करता आलेला नाही. पण त्यांच्या मातोश्रीसह अनेक सहकार्यांना हेलिकॉप्टर खरेदीच्या दलालीत गुंतवून देणारा साक्षीदारही मोदींनी भारतात उचलून आणला आहे. तेव्हा त्याला कसे तोंड द्यायचे, ही चिंतेची बाब झाली आहे. याला मग मोदींचे सूडबुद्धीचे राजकारण म्हणायची एक फॅशन झाली आहे. पण खरेच मोदी सूडबुद्धीने निर्णय घेतात काय?
सत्ता येऊन साडेचार वर्षे उलटल्यावरही मोदींनी कुणाही एका अन्य पक्षाच्या नेत्याला पुराव्याशिवाय गोत्यात घालण्याचे उद्योग केलेले नाहीत. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या विरोधात कसलाही पुरावा नसताना लागोपाठ कोर्टाचे दार ठोठावून किती विशेष तपासपथके नेमली गेली? त्यांना गोवायचे म्हणून इशरत जहां या जिहादी मुस्लिम तरुणीला निरागस ठरण्यासाठी किती खोटे बोलले गेले होते? शिवराज पाटील हे युपीए- काँग्रेसचेच गृहमंत्री होते आणि त्यांनी अहमदाबादच्या चकमकीत पाकची हस्तक, तोयबावाली इशरत मारली गेल्याची लोकसभेला ग्वाही दिलेली होती. तर त्यांचे शब्द त्यांच्यानंतर गृहमंत्री झालेल्या चिदंबरम् यांनी फिरवले आणि मोदींना अडकवण्यासाठी इशरतला निष्पाप तरुणी ठरवले होते. त्याला सूडबुद्धी म्हणतात. जिथे एकाच पक्षाचे केंद्र सरकार अन्य पक्षाच्या मुख्यमंत्र्याला गोत्यात घालण्यासाठी आपलेच निवेदन व निष्कर्ष बदलून खोटे बोलू लागते, त्याला सूडबुद्धी म्हणतात. मोदींनी कुठल्याही बाबतीत तो उद्योग केलेला नाही. पण सोनिया वा युपीएच्या सरकारने सतत तेवढेच केलेले होते. कायदे व न्यायालये धाब्यावर बसवून देशाचा कारभार हाकलेला होता. मोदीच कशाला? युपीए वा सोनियांना सत्तेमध्ये आणायला ज्याचे कर्तृत्व कामी आले, त्या राजशेखर रेड्डी यांच्या सुपुत्राला आपले ऐकत नाही म्हणून सोनियांनी ईडी व सीबीआयच्या सापळ्यात किती वर्षे अडकवून ठेवले होते? किती वर्षे जगनमोहन रेड्डी जामिनाअभावी तुरुंगात खितपत पडला होता? चिदंबरम् ज्या आरोपासाठी सूडबुद्धीची टकळी रोज वाजवतात, तेच अर्थमंत्री म्हणून काम करताना जगनला छळत नव्हते काय? जे त्यांनी जगनच्या बाबतीत केले ते सूडबुद्धीचे नसेल; तर मोदी सरकार कातीं चिदंबरमच्या बाबतीत करते त्याला सूडबुद्धी कसे म्हणता येईल? अन्यथा या लोकांनी निदान आपला अनुभव तरी सांगून टाकावा. म्हणजे चिदंबरम वा सोनिया गांधी हाती सत्ता असताना कायदा वाकवून किंवा पुराव्यांची हेराफ़ेरी करून सूडाचे राजकारण खेळत होत्या आणि त्यात आपण जसे वागलो तसेच नेमके मोदी वागत असल्याने त्याला सूडबुद्धीचे राजकारण म्हणतात, असेही सांगायला हरकत नाही. पण त्यात आधी आपल्या पापाची वा गुन्ह्याची कबुली तरी द्यायला हवी ना? चिदंबरम माजी मंत्री आहेत आणि तरीही ईडी वा सीबीआयच्या चौकशीत सहकार्य द्यायला राजी नाहीत. कोर्टाने सांगितले म्हणून त्यांच्या सुपुत्राला सीबीआयसमोर हजर व्हावे लागले. पिताजी अजून समोर यायला राजी नाहीत. पण तेच गृहमंत्री असताना, मुख्यमंत्री असूनही मोदींनी सीबीआयच्या चौकशीला नकार दिला नव्हता. सोनिया वा चिदंबरम यांच्यावर सूडबुद्धीचा आरोप मोदींनी मुख्यमंत्री असताना केलेला नव्हता. चोरीच केलेली नसेल तर तपासाला त्यांनी का घाबरावे? म्हणून मोदी सामोरे गेले आणि हे चोर तोंड लपवून पळत आहेत. सूडबुद्धीचे प्रत्यारोप करीत आहेत. कारण सूडबुद्धीने तेच वागलेले आहेत आणि अशा यंत्रणा त्यांनी सतत सूडबुद्धीच्या कारवायांसाठीच वापरलेल्या आहेत. म्हणून तर इतके घोटाळे होऊनही अशा यंत्रणा हात चोळत बसल्या होत्या. कोर्टाने कान पकडला म्हणूनच कामाला लागल्या होत्या. अन्यथा खर्याखुर्या चोरांना हात लावण्याची त्या यंत्रणांची कधी हिंमत झाली नाही. उलट नीरव मोदी, मेहुल चोक्सी, विजय माल्या अगदी निर्धास्त होते आणि कुठलाही पुरावा किंवा गुन्हा नसताना नरेंद्र मोदी वा अमित शहा यांना कोर्टाच्या, तपासाच्या पायर्या झिजवाव्या लागत होत्या. युपीए वा काँग्रेसचा कारभार म्हणजे सूडबुद्धीने विविध शासकीय यंत्रणांचा राजरोस वापर होता. आता त्या स्वतंत्र झाल्यामुळेच झपाट्याने पापे चव्हाट्यावर येत आहेत, तर त्यातही खोडा घालण्याचे उद्योग चालू आहेत. नसेल तर सीबीआयमधील भांडण कशाला उकरून काढण्यात आले?
कालपरवा ज्या ख्रिश्चन मिशेल नामक भामट्याला दुबईहून उचलून भारतात आणले गेले, त्याचा तपास कोणी केला होता? दोन वर्षे असे युपीएच्या पापाचे पुरावे शोधून काढण्याचे काम राकेश अस्थाना या अधिकार्याच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक करीत होते. त्यापैकीच अधिकार्यांनी मंगळवारी मिशेल याला दुबईतून भारतामध्ये आणलेले आहे. पण ते होऊ नये म्हणून किती आटापिटा झाला? विशेष संचालक म्हणून अस्थाना यांना आणले गेले. काही अधिकारी सीबीआयमध्ये बसून पूर्वीच्या मालकांशी निष्ठा असल्यासारखे काम करीत होते. त्यांना शह देण्यासाठीच अस्थाना यांना सीबीआयमध्ये आणले गेले होते. त्यांच्या खास तपास पथकाकडली प्रकरणे बघितली तरी त्याची साक्ष मिळते. मग त्यात गुंतलेल्यांना सोडवण्यासाठी अस्थाना यांच्यावर बालंट आणले गेले. ज्या आलोक वर्मा यांच्या नेमणुकीच्या विरोधात प्रशांत भूषण यांनी कोर्टात याचिका केली होती, तेच मग वर्मांना बाजूला करण्याच्या विरोधात याचिका घेऊन उभे राहिले. हा सगळा घटनाक्रम बघितला, तर लक्षात येते की, नरेंद्र मोदी अशा सर्व पुरोगाम्यांना कशाला नको आहेत? ना खाऊंगा ना खाने दुंगा, ही आपली घोषणा मोदी प्रामाणिकपणे राबवायला बघत आहेत. म्हणूनच त्यातले आरोपी संशयित आणि त्यांच्या विरोधात लुटूपुटूची कायदेशीर लढाई करणारे सगळे, मोदी विरोधात एकवटले आहेत. सगळे जणू सूडाला पेटले आहेत. हा माणूस आणखी पाच वर्षे सत्तेत राहिला, तर तमाम भ्रष्टाचारी व त्यांचे पोशिंदे पुरोगामी यांची पाळेमुळे खणून काढण्याच्या भयाने त्यांना पुरते पछाडले आहे. त्याच भयापोटी सूडबुद्धीचे आरोप आता वाढत जाणार आहेत आणि अतिशय खालच्या पातळीवरून मोदींच्या बदनामीच्या मोहिमा राबवल्या जाणार आहेत. कारण आजवर ज्यांनी सूडबुद्धीने राजकारण व समाजकारण केले, त्यांना आता आपल्याच पापाची भुते भयभीत करू लागलेली आहेत.