स्तुत्य आणि अभिनंदनीय जनसंवाद
5 Dec 2018जिल्ह्याचा पालकमंत्री कसा असावा, याचे आदर्श उदाहरण घालून दिले आहे नागपूरचे पालकमंत्री आणि राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी! त्यांच्याकडे नागपूरसोबतच भंडारा जिल्ह्याचेही पालकमंत्रिपद आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी युतीच्या काळात नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री होते, त्यानंतर १५ वर्षांनी नागपूरला त्यांच्याचसारखा धडाकेबाज कामगिरी करणारा पालकमंत्री बावनकुळे यांच्या रूपाने लाभला, हे नागपूर जिल्ह्यातील लोकांचे भाग्यच म्हटले पाहिजे. प्रशासनावर पकड आणि वचक असल्यास जनतेची कामे कशी पटापट होतात, हे बावनकुळे यांच्या कार्यशैलीने सिद्ध केले आहे. नागपूर जिल्ह्यात गेल्या चार वर्षांत कोणकोणती कामे झालीत, कोणती करायची राहिलीत, याचा आढावा घेताना पालकमंत्र्यांना विषयांची जाण असणे आवश्यक असते. ती जाण नसेल तर प्रशासन मंत्र्यांनाही मूर्ख बनविते. हा अनुभव आहे. पण, बावनकुळे यांचे तसे नाही. भारतीय जनता पार्टीचा एक सामान्य कार्यकर्ता ते राज्याचा ऊर्जामंत्री, असा प्रवास करताना त्यांनी अनेक राजकीय चढउतार अनुभवलेत. आपल्या अनुभवसमृद्ध राजकीय वाटचालीचा लाभ समाजाला झाला पाहिजे, या कळकळीने ते सातत्याने काम करीत असतात. नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करताना राज्याच्या उपराजधानीचे शहर असलेल्या नागपूर शहरातील नागरिकांच्या समस्या काय आहेत, त्या का निर्माण झाल्या, त्या सोडविण्यासाठी काय काय करायला हवे, याची संपूर्ण जाण असल्यानेच ते जनतेला न्याय देऊ शकत आहेत. सध्या त्यांनी, नागपूरच्या महापौर नंदा जिचकार यांच्यासोबत शहरातील विविध भागात जनसंवाद कार्यक्रम घेण्याचा धडाका लावला आहे. या आधी अनेक नेत्यांनी जनता दरबार घेतलेत, पण ते आपापल्या कार्यालयात वा एखाद्या हॉलमध्ये. पण, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनसंवाद कार्यक्रमाची शैलीच वेगळी आहे. त्यांनी महापौर आणि मनपाच्या अधिकारी-पदाधिकार्यांना सोबत घेत थेट जनतेचे द्वार गाठले आहे. थेट जनतेपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या ऐकायच्या आणि त्यावर तिथल्या तिथे उपाय सुचवून अधिकार्यांना आणि प्रशासनाला कामाला लावायचे, ही त्यांच्या कामाची वैशिष्ट्यपूर्ण शैली म्हणावी लागेल. परवा, सोमवारी त्यांनी नागपूर महानगरपालिकेच्या मंगळवारी झोनमध्ये जनसंवाद कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमाला अपेक्षेप्रमाणेच प्रचंड प्रतिसाद मिळाला. हजारावर आलेल्या तक्रारींमधून २७९ तक्रारींचा त्यांनी तिथल्या तिथेच निपटारा केला, ही त्यांच्या कामाची विशेष पद्धत म्हणावी लागेल. नागपूर शहरात काय समस्या आहेत, त्या का निर्माण झाल्या आहेत, त्या सोडविण्यासाठी काय केले पाहिजे, याची संपूर्ण तयारी आणि अभ्यास करूनच चंद्रशेखर बावनकुळे जनसंवाद कार्यक्रमात उपस्थित राहात असल्याने अधिकार्यांवरही आधीपासूनच दडपण असते. त्यामुळे तेही संपूर्ण अभ्यास आणि तयारी करूनच कार्यक्रमात उपस्थित राहतात आणि त्याच्याच परिणामी एकाच ठिकाणी पावणेतीनशेपेक्षा जास्त तक्रारींचा निपटारा होऊ शकतो, हे लक्षात घेतले पाहिजे. जनतेने आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले असल्याने आपली जबाबदारी अधिक वाढते, जनतेची कामे करणे म्हणजे त्यांच्यावर उपकार करणे नसून, ते आपले कर्तव्य ठरते, ही जाणीव असेल तरच असे जनसंवाद कार्यक्रम आयोजित होऊ शकतात. चंद्रशेखर बावनकुळे यांना याची जाण असल्याने आणि तळागाळातील जनतेची कामे झाली पाहिजेत, ही तळमळ असल्यानेच ते थेट जनतेच्या दरबारात जाणे पसंत करतात आणि जनतेत जाण्याची हिंमतही दाखवितात. विरोधी पक्षात असताना सत्ताधारी पक्षावर टीका करणे सोपे असते. पण, विरोधी बाकांवरून सत्ताधारी बाकांवर आल्यावर आपली जबाबदारी अधिक वाढते, याची जाणीव ज्या सत्ताधार्यांना असते, ते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारखे मंत्रीच जनतेच्या दारी जाण्याचे धाडस दाखवू शकतात. निवडून आल्यानंतरही जे नेते कायम जनतेच्या संपर्कात असतात, आपल्या मतदारसंघातील वा कार्यक्षेत्रातील समस्या जाणून घेत त्यांचा अभ्यास करून त्या सोडविण्यासाठी झटत असतात, तेच नेते जनतेपुढे जायला घाबरत नाहीत. अन्यथा, अनेक नेते असे आहेत, जे निवडणूक जिंकल्यानंतर साडेचार वर्षे मतदारसंघात फिरकतही नाहीत, त्यांना मग जनताही जागा दाखवून देत असते. आपल्या राज्याच्या विधानसभेत अनेक आमदार असे आहेत, की जे चार वेळा, पाच वेळा, आठ वेळा निवडून आले आहेत. गणपतराव देशमुख हे सर्वात ज्येष्ठ सदस्य दहा वेळा निवडून आले आहेत. या नेत्यांना त्यांच्या मतदारसंघातील लोक का निवडून देतात, याचा विचार केला, तर चंद्रशेखर बावनकुळे यांची कार्यशैली डोळ्यांपुढे येते. रस्ते, वीज, पाणी, स्वच्छता, आरोग्याच्या सोई उत्तम मिळाव्यात, अशी जनतेची किमान अपेक्षा असते. ती पूर्ण करण्यासाठी जे नेते झटून काम करतात, जास्तीत जास्त निधी आपल्या मतदारसंघात आणण्यासाठी प्रयत्न करतात, जनतेशी संपर्क ठेवून त्यांची गार्हाणी ऐकून घेतात, आपल्याकडून शक्य होईल ती सगळी मदत करण्याची धडपड करतात, त्या नेत्यांना जनतेपुढे जाताना घाबरण्याची गरज नसते. ऊर्जामंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे अशाच नेत्यांपैकी एक आहेत. राज्यात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या युतीचे सरकार सत्तेत येऊन चार वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. या सरकारने पूर्वीच्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या सरकारच्या तुलनेत अतिशय सरस कामगिरी अवघ्या चार वर्षांत केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अथक परिश्रम घेत मराठा समाजबांधवांना कायद्याच्या कसोटीवर टिकेल असे १६ टक्के आरक्षण दिले आहे. त्यामुळे या सरकारची कामगिरी अधिक उजळून निघाली आहे. पण, निवडणुकीच्या आधी दिलेली सगळीच आश्वासनं पूर्ण झाली आहेत, असे समजण्याचे कारण नाही. विधानसभेच्या निवडणुकीला आणखी एक वर्ष आहे. जी कामं झाली नाहीत, होऊ शकली नाहीत, करता येण्यासारखी आहेत, ती करण्यासाठी वर्षभराचा कालावधी शिल्लक आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी, नागपूरच्या महापौर नंदा जिचकार, सत्तापक्षनेते संदीप जोशी यांना सोबत घेऊन नागपूर शहरात विभागवार जसे जनसंवाद कार्यक्रम घेतलेत, तसे कार्यक्रम प्रत्येक जिल्हास्थानी आणि विधानसभा मतदारसंघनिहाय भाजपा-सेनेच्या सगळ्या पालकमंत्र्यांनी घेतलेत, तर जनतेचा या सरकारवर असलेला विश्वास अधिक वृद्धिंगत होईल आणि राज्याची सर्वांगीण प्रगती घडवून आणण्याचे भाजपाप्रणीत सरकारचे स्वप्नही पूर्ण होईल. राजकीय इच्छाशक्ती असेल तर असाध्य गोष्टही साध्य करता येऊ शकते, हे फडणवीस सरकारने प्रत्यक्ष कृतीने दाखवून दिले आहे. फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये ऊर्जामंत्री म्हणून काम करणारे चंद्रशेखर बावनकुळे यांनीही आपल्या कार्यकर्तृत्वाने सरकारची प्रतिमा प्रकाशमान करण्यात मोठा वाटा उचलला आहे, यात शंका नाही! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात तयार झालेले बावनकुळे यांचे नेतृत्व राज्याच्या विकासात ऊर्जा विभागाच्या माध्यमातून मोठा हातभार लावत आहे, ही आनंदाची बाब म्हटली पाहिजे…
Short URL : https://tarunbharat.org/?p=69013